Mohammad Rizwan Equals Rohit Sharma Record: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत मंगळवारी पाकिस्तान विरुद्ध कॅनडा संघात सामना झाला. न्युयॉर्कला झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने 7 विकेट्सने विजय मिळवला. पाकिस्तानच्या या विजयात मोहम्मद रिझवानने मोठे योगदान दिले.
या सामन्यात कॅनडाने पाकिस्तानसमोर कॅनडाने 107 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानकडून सलामीवीर मोहम्मद रिझवानने 53 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकारासह 53 धावांनी नाबाद खेळी केली.
रिझवानने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सलामीला फलंदाजी करताना ५० धावांचा टप्पा पार करण्याची ही 30 वी वेळ होती. यामध्ये 29 अर्धशतके आणि 1 शतकाचा समावेश आहे. त्यामुळे त्याने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणाऱ्या सलामीवीरांच्या यादीत रोहित शर्माच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे.
या विक्रमाच्या यादीत रोहित अव्वल क्रमांकावर आहे. रोहितनेही आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सलामीला खेळताना 30 वेळा 50 धावांचा टप्पा पार केला आहे. रोहितने 25 अर्धशतके आणि 5 शतके केली आहेत.
30 वेळा - मोहम्मद रिझवान (75 सामने)
30 वेळा - रोहित शर्मा (119 सामने)
28 वेळा - बाबर आझम (87 सामने)
27 वेळा - डेव्हिड वॉर्नर (99 सामने)
24 वेळा - पॉल स्टर्लिंग (140 सामने)
या सामन्यात कॅनडाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 106 धावा केल्या होत्या. कॅनडाकडून एकटा ऍरॉन जॉन्सन लढला. त्याने 44 चेंडूत 52 धावांची खेळी केली. पाकिस्तानकडून मोहम्मद अमीर आणि हॅरिस रौफ यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतले.
त्यानंतर 107 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग पाकिस्तानने 17.3 षटकात 3 विकेट्स गमावत पूर्ण केला. रिझवान व्यतिरिक्त बाबर आझमने 33 धावांची खेळी केली. रिझवान आणि बाबर आझम यांच्यात महत्त्वपूर्ण 63 धावांची भागीदारीही झाली. त्यामुळे पाकिस्तानला विजय मिळवणे सोपे गेले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.