Sri Lanka vs Ireland, 8th Match, Group A : हसरंगाच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर श्रीलंका संघाने आयर्लंडला 70 धावांनी पराभूत करत सुपर 12 मध्ये स्थान पक्के केले. आयर्लंडच्या संघाने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आयरिश गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत सुरुवातीला श्रीलंका संघाला धक्क्यावर धक्के दिले. दुसऱ्या षटकात आयर्लंडने श्रीलंका संघाची अवस्था 3 बाद 8 अशी केली होती.
त्यानंतर सलामीवीर निसंकाच्या साथीनं हसरंगाने चौथ्या विकेटसाठी 123 धावांची दमदार भागीदारी केली. हसरंगाने 47 चेंडूत 10 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 71 धावांची खेळी केली. पथुम निसंकाने 61 धावांची खेळी केली. या दोघांच्या अर्धशतकाच्या जोरावर श्रीलंका संघाने निर्धारित 20 षटकात 7 बाद 171 धावा केल्या होत्या. आयर्लंडकडून जोशुआ लिटलेने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. मार्क एडायराल दोन तर स्टर्लिंगला एक यश मिळाले.
श्रीलंकाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना आयर्लंडचे सलामीवीर स्वस्तात माघारी फिरले. केविन ओब्रायनच्या रुपात करुणारत्नेनं आयर्लंडला पहिला धक्का दिला. त्याच्यापाठोपाठ तीक्षणाने स्टर्लिंगला 7 धावांवर माघारी धाडले. आयर्लंडचा कर्णधार अँड्र्यू बलबायरने 39 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 41 धावांची खेळी केली. ही खेळी आयर्लंडकडून सर्वोच्च ठरली. कुर्टीस कँफरने 24 धावा केल्या. या दोघांशिवाय एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. परिणामी आयर्लंडचा संघ 18.3 षटकात 101 धावांत आटोपला. श्रीलंकेकडून तीक्षणाने सर्वाधिक 3 तर लाहिरु कुमारा 2, चमिरा करुणारत्ने 2, दुशमंथा चमिरा आणि हसरंगा यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.
पहिल्या फेरीतील अ गटात श्रीलंका आणि आयर्लंडशिवाय नामीबिया आणि नेदरलंड या संघांचा समावेश आहे. सध्याच्या घडीला श्रीलंका या गटात टॉपला असून ते सुपर 12 मधील पहिल्या गटात खेळताना दिसू शकतात. आयर्लंड, नामिबिया आणि नेदरलंड अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असून प्रत्येक संघाचा एक-एक सामना बाकी आहे. या गटातून सुपर 12 साठी दुसरा संघ कोणता येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.