T20 World Cup Final : सुसाट सुटलेली आफ्रिकेची गाडी शेवटच्या टप्प्यावर अडखळली, शेवटच्या तीन षटकांत काय घडले?

last three overs india t20 world cup win final drama: विश्वविजेतेपदाचे स्वप्न अखेर साकार; विराट सामन्यात सर्वोत्तम
last three overs india t20 world cup win final drama
last three overs india t20 world cup win final drama
Updated on

बार्बाडोस - क्षणाक्षणाला चढ-उतार होत राहिलेल्या अंतिम सामन्यात हेन्रिक क्लासेनच्या अफलातून अर्धशतकी खेळीने विजेतेपदाकडे सुसाट पळत सुटलेला द. आफ्रिकन संघ शेवटच्या टप्प्यावर अडखळला. अखेरच्या तीन षटकांत कमाल नाट्य घडले. एकामागोमाग एक फलंदाजांना बाद करत भारतीय गोलंदाजांनी सामना खेचून आणला.

प्रथम फलंदाजी करताना सात बाद १७६ धावा भारतीय फलंदाजांनी उभारल्या आणि मग द. आफ्रिकन फलंदाजीला आठ बाद १६९ धावांवर रोखून अंतिम सामना सात धावांनी जिंकला. १७ वर्षांनंतर टी-२० विजेतेपदाचे स्वप्न साकारले गेले आणि आयसीसी स्पर्धेतील विजेतेपदाचा १३ वर्षांचा उपवास संपला.

केन्सींग्टन ओव्हल मैदानावरच्या खेळपट्टीचा स्वभाव बघून रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजी करायचा धाडसी निर्णय घेतला. दोनही संघांत कोणताच बदल करण्यात आला नाही. सामन्याची सुरुवात अनपेक्षित झाली. मार्को जेन्सनच्या पहिल्याच षटकात विराट कोहलीने तीन कडक चौकार मारताना १५ धावा भारताच्या खात्यात जमा केल्या.

कप्तान मार्करमने लगेच दुसऱ्या बाजूने विचार बदलून केशव महाराजची फिरकी गोलंदाजी आणली. महाराजला रोहित शर्माने दोन पाठोपाठ चौकार मारून दडपणाखाली टाकले आणि मग मैदानावर नाट्य घडले. स्वीपचा फटका मारताना रोहित शर्मा आणि रिषभ पंत पाठोपाठ बाद झाले. पाच चौकार लगावल्यावर ओरडू लागलेले भारतीय प्रेक्षक शांत झाले.

सूर्यकुमार यादवपण लवकर बाद झाला. तीनपैकी दोन झेल क्लासेनने पकडले. तीन महत्त्वाचे फलंदाज बाद झाल्याने डाव सावरण्याची जबाबदारी विराट कोहलीवर आली. संघ व्यवस्थापनाने पाचव्या क्रमांकावर अक्षर पटेलला फलंदाजीला पाठवले. पॉवर प्लेच्या सहा षटकांत तीन बाद ४५ धावा झालेल्या दिसत होत्या.

विराट कोहलीसोबत प्रत्येक सामन्यात योगदान दिलेला अक्षर पटेल समंजस फलंदाजी करून डाव सावरू लागले. अक्षरने वरच्या क्रमांकावर फलंदाजी करायला मिळालेल्या संधीचा उपयोग करत आपली क्षमता दाखवली. १० षटकांत अजून विकेट न गमावता तीन बाद ७५ धावांची मजल मारली गेली. ७२ धावांची रंगलेली भागीदारी डिकॉकच्या हुशारीने तुटली.

भन्नाट फलंदाजी करून ४७ धावा करणारा अक्षर पटेलला डिकॉकने नॉन स्ट्रायकींग एंडच्या स्टंपवर सरळ चेंडू फेकून धावबाद केले. संघाला गरज असताना अर्धशतक पूर्ण केल्यावर कोहलीने बॅट वर केली नाही. मोठा फटका मारताना कोहली ७६ धावा करून तंबूत परतला. शिवम दुबेच्या आक्रमक २७ धावांसोबत शेवटच्या तीन षटकांत ४२धावा काढल्याने भारतीय संघाला २० षटकांच्या अखेरीला सात बाद १७६चा धावफलक उभारता आला.

भारतीय संघाप्रमाणेच दक्षिण आफ्रिकन फलंदाजीची सुरुवात अडखळती झाली. रिझा हेंड्रीक्सला बुमराने अफलातून चेंडू टाकून बोल्ड केले आणि कप्तान मार्करम अर्शदिपसिंगला झेलबाद झाला. क्वींटन डिकॉकवर भारतीय संघाची नजर खिळली ज्याला तरुण गुणवान स्टब्ज् येऊन मिळाला.

भारतीय फिरकी गोलंदाजांनी कमी वेगाने मारा करायचा प्रयत्न केला ज्याला जास्त यश आले नाही. सहा चौकार एक षटकार मारून दोघा फलंदाजांनी झटपट अर्धशतकी भागीदारी रचली. धावा रोखण्यापेक्षा फलंदाजाला बाद करायची गरज निर्माण झाली. धोका पत्करून ३१ धावा वेगाने करणारा स्टब्ज् अक्षरला बोल्ड झाला आणि धोकादायक ठरत चाललेली भागीदारी तुटली.

एका बाजूला उभे राहण्याची जबाबदारी डिकॉकवर होती आणि मोठे फटके मारायची क्लासेनवर. डिकॉक बाद झाला ज्याचे श्रेय योग्य निरीक्षण करणाऱ्या बुमराला जाते. ज्या चेंडूअगोदर बुमराने कुलदीप यादवला मागे सरकायला सांगितले, त्याच चेंडूवर डिकॉकने कुलदीपकडेच झेल दिला. खरा खेळाचा रंग बदलला हेन्रीक क्लासेनने. भारतीय फिरकी गोलंदाजांवर कडाडून हल्ला चढवताना क्लासेनने पाच षटकार मारले.

अपेक्षित धावगती अचानक नियंत्रणाखाली आली ती केवळ क्लासेनच्या २४ चेंडूतील अर्धशतकी खेळीने. हार्दिक पंड्याने क्लासेनला बाद केले आणि आशा परतल्या. शेवटच्या तीन षटकांत २२ धावा करून विजेतेपद पटकावणे दक्षिण आफ्रिकेसाठी मोठे आव्हान नव्हते. गरज होती फलंदाजाला बाद करायची. बुमराने अचूक मारा करून दोन धावा दिल्या आणि जेन्सनला बोल्ड केल्याने सामना रंगला.

दोन षटकांत २० धावांचे लक्ष समोर आले. १९वे षटक अर्शदीपने टाकले ज्यात फक्त तीन धावा दिल्या. अखेरचे षटक १६ धावा असा सामना अटीतटीच्या टप्प्यावर आला. हार्दिकच्या पहिल्या चेंडूवर मिलरचा अशक्य झेल सूर्यकुमारने पकडला आणि मग हार्दिकने सर्व कौशल्य पणाला लावून फलंदाजांना रोखले.

संक्षिप्त धावफलक

संक्षिप्त धावफलक - भारत २० षटकांत ७ बाद १७६ (रोहित शर्मा ९-५ चेंडू, २ चौकार, विराट कोहली ७६-५९ चेंडू, ६ चौकार, २ षटकार, रिषभ पंत ०, सूर्यकुमार ३, अक्षर पटेल ४७-३१ चेंडू, १ चौकार, ४ षटकार, शिवम दुबे २७-१६ चेंडू, ३ चौकार, १ षटकार, यान्सेन ४-०-४९-१, केशव महाराज ३-०-२३-२, नॉर्किया ४-०-२६-२) वि. वि. दक्षिण आफ्रिका - २० षटकांत ९ बाद १६९ (क्विन्टॉन डिकॉक ३९ - ३१ चेंडू, ४ चौकार, १ षटकार, त्रिस्टन स्टब्स ३१ - २१ चेंडू, ३ चौकार, १ षटकार, हेन्रिक क्लासेन ५२ - २७ चेंडू, २ चौकार, ५ षटकार, डेव्हिड मिलर २१ - १७ चेंडू १ चौकार, १ षटकार, अर्शदीप सिंग ४-०-२०-२, जसप्रीत बुमरा ४-०-१८-२, हार्दिक पंड्या ३-०-२०-३)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.