T20 World Cup : टीम इंडियाला 14 वर्षांनंतर पुन्हा टी-20 तील वर्ल्ड चॅम्पियन बनवण्यासाठी महेंद्र सिंह धोनीने कंबर कसली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतर धोनी मेंटॉर म्हणून टीम इंडियाच्या ताफ्यात जॉईन झालाय. सराव सामन्यापासून धोनी आणि विराट कोहलीची कसोटी सुरु झालीये. इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या सराव सामन्यात भारतीय संघाने दिमाखदार विजय नोंदवला. या सामन्यानंतर धोनी आणि विराट कोहलीसमोर काही प्रश्न अनुत्तरित राहिले तर काही प्रश्नांचा गुंता निर्माण झालाय. कमी वेळात अनुत्तरित प्रश्न सोडवून गुंतागुतीच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे आव्हान या जोडगोळीसमोर उभा राहिले आहे. नजर टाकूयात सराव सामन्यानंतर धोनी आणि कोहलीसमोर निर्माण झालेल्या तीन मोठ्या प्रश्नांवर...
सलामीचा तिढा सुटल्यानंतरचा गुंता....
इंग्लंड विरुद्धच्या सराव सामन्यातील टॉस नंतर विराट कोहलीने सलामीचा संभ्रम दूर केला. रोहितसोबत लोकेश राहुल भारतीय डावाला सुरुवात करेल, असे त्याने स्पष्ट केले. पण सराव सामन्यात रोहित ऐवजी लोकेश राहुलसोबत इशान किशनला संधी देण्यात आली. त्याने संधीच सोन करुन दाखवत आपली दावेदारी भक्कम केली. आयपीएलच्या हंगामात इशान किशनला नावाला साजेसा खेळ करता आला नव्हता. मात्र अखेरच्या साखळी सामन्यात त्याने आपल्या भात्यातील फटकेबाजी दाखवून दिली. आणि सराव सामन्यात फटकेबाजीतील सातत्य कायम राखले. त्यामुळे इशान किशनला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवायचे की त्याला बाकावरच बसवायचा हा मोठा प्रश्न आता विराट आणि धोनीसमोर निर्माण झाला आहे. रोहित आणि लोकेश राहुलचे स्थान प्लेइंग इलेव्हनमध्ये जवळपास फिक्स आहे. या परिस्थितीत दमदार कामगिरी करणाऱ्या इशानचा वापर धोनी अँण्ड कोहली कसा करुन घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. यापूर्वी विराट-रोहित भारतीय डावाला सुरुवात करतील, असे बोलले जात होते. पण लोकेश राहुलनं आयपीएलमधील कामगिरीनं ओपनरच तिकीट बुक केलं. सलामीचा तिढा सुटता सुटता इशान किशनच्या बहरदार खेळीमुळे पुन्हा एक तिढाच निर्माण झालाय. तो सोडवण्याचे आव्हान मेंटॉर धोनीसह कर्णधार विराट कोहलीसमोर असणार आहे.
हार्दिक पांड्यातील अष्टपैलूत्वाचा अभाव चिंतेचा विषय
हार्दिक पांड्याकडे भारतीय संघातील हुकमी एक्का म्हणून पाहिले जात आहे. पण तो गोलंदाजी करत नसल्यामुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्यासंदर्भात अनेक मतभेद पाहायला मिळतात. इंग्लंड विरुद्धच्या सलामीच्या सामन्यात मोक्याच्या क्षणी हार्दिक पांड्या क्रिजवर उतरला. आणि नाबाद परतलाही. पण त्याच्यात मॅच फिनिश करण्याचा हवा असलेला तोरा पाहायला मिळाला नाही. 12 धावांच्या खेळीत हार्दिक पांड्याने 2 चौकार मारले पण गोलंदाजी न केल्यामुळे पुन्हा त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्यासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थितीत होत आहे. हा एक मोठा प्रश्न धोनी-कोहलीसमोर असेल.
भुवनेश्वर कुमारची खराब कामगिरी
इंग्लंड विरुद्धच्या सराव सामन्यात प्रमुख गोलंदाज भुवनेश्वर कुमारची चांगलीच धुलाई झाली. 4 षटकात त्याने 13.50 च्या सरासरीने 54 धावा खर्च केल्या. त्याचा फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय आहे. भारतीय संघातील तो अनुभवी गोलंदाज आहे. त्यामुळे पाकिस्तान विरुद्धच्या सलामीच्या सामन्यात त्याच्यासह मैदानात उतरायचे की युवा शार्दुल ठाकूरचा ट्रम्प कार्ड म्हणून वापर करायचा? हा प्रश्नाचे उत्तर धोनी-कोहलीला मिळवून सोडवावे लागेल. पाकिस्तान विरुद्धच्या लढतीपूर्वी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसरा सराव सामना खेळणार आहे. त्या सामन्यानंतर टीम इंडियाला सलामीच्या मुख्य लढतीसाठी रणनिती आखणे सहज सुलभ होईल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.