India vs South Africa T20 World Cup Final : फायनलमध्ये भारताची फलंदाजी आणि गोलंदाजी यांच्यावर एक वेळ अशी आली की सामना भारताच्या हातातून जाईल असे वाटत होते. मात्र, आधी अक्षर पटेलने फलंदाजी करताना विराट कोहलीला साथ दिली आणि गोलंदाजीची पाळी आली तेव्हा भारताच्या वेगवान गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेच्या तोंडचा घास पळवला.
आणि भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून 11 वर्षांचा दुष्काळ संपवला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाची कामगिरी या स्पर्धेत दमदार राहिली आणि संघाने गट टप्प्यापासून अंतिम फेरीपर्यंत आपली क्षमता सिद्ध केली. जेतेपदाच्या सामन्यात भारतीय संघाची एकेकाळी चांगली स्थिती नव्हती, पण गोलंदाजांनी अखेरीस टेबल फिरवले आणि संघाला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये भारताचा प्रवास
टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाचा अ गटात समावेश करण्यात आला होता, ज्यामध्ये पाकिस्तान, आयर्लंड, अमेरिका आणि कॅनडा देखील होते. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी, भारताने बांगलादेशविरुद्ध एकमेव सराव सामना खेळला, जो जिंकला. भारताने ग्रुप स्टेजचे सर्व सामने अमेरिकेत खेळले.
भारताचा स्पर्धेतील पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंड विरुद्ध होता, ज्यात संघाने आठ विकेट्स राखून विजय मिळवला होता. यानंतर 9 जूनला न्यूयॉर्कमध्ये या संघाचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सामना झाला. या सामन्यात भारतीय संघाची स्थिती फारशी चांगली नव्हती, पण अखेरीस गोलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे भारताला पाकिस्तानचा सहा धावांनी पराभव करण्यात यश आले. त्यानंतर 12 जून रोजी संघाचा अमेरिकेशी सामना झाला जेथे भारताने सात गडी राखून विजय मिळवला आणि सुपर एट टप्प्यासाठी पात्र ठरले. भारताचा ग्रुप स्टेजमधील शेवटचा सामना कॅनडाविरुद्ध फ्लोरिडामध्ये होता जो पावसामुळे रद्द झाला होता.
त्यानंतर टीम इंडिया पुढच्या सुपर-8 फेरीसाठी वेस्ट इंडिजला गेला जिथे त्याचा पहिला सामना 20 जून रोजी अफगाणिस्तानविरुद्ध झाला. भारतीय संघाने या सामन्यात चमकदार कामगिरी करत 47 धावांनी विजय मिळवला. यानंतर संघाने 22 जून रोजी बांगलादेशचा 50 धावांनी पराभव केला. 24 जून रोजी पुन्हा एकदा भारताचा सामना एकदिवसीय वर्ल्ड कप विजेत्या संघ ऑस्ट्रेलियाशी झाला आणि कर्णधार रोहित शर्माच्या बळावर भारतीय संघाने हा सामना 24 धावांनी जिंकून उपांत्य फेरीत धडक मारली. अंतिम चारमध्ये भारताचा सामना गतविजेत्या इंग्लंडशी झाला. 2022 मध्ये उपांत्य फेरीत भारताचा पराभव करून इंग्लंडने भारताची मोहीम संपुष्टात आणली होती. भारताने गतविजेत्या संघाचा 68 धावांनी पराभव करून बदला घेतला आणि विजेतेपदाच्या सामन्यात प्रवेश केला.
रोहित शर्माची कॅप्टन्सी
भारतीय संघाच्या या चमकदार कामगिरीचे सर्वात मोठे श्रेय रोहित शर्माच्या कर्णधारपदाला जाते. टीम इंडियाच्या खेळाडूंना सपोर्ट करणे आणि त्यांना पुढील सामन्यासाठी प्रोत्साहन देणे हे कर्णधाराचे सर्वात कौतुकास्पद काम आहे. विशेष म्हणजे रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने तीन आयसीसी स्पर्धांचे अंतिम सामने खेळले आहेत. यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023, वनडे वर्ल्ड कप 2023 आणि टी-20 वर्ल्ड कप 2024 यांचा समावेश आहे. टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची निवड झाली तेव्हा त्यात चार फिरकीपटूंचा समावेश करण्यात आला होता. यावर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते आणि पण आता त्याने हा निर्णय का घेतला समजेल. भारताने ज्या पद्धतीने फिरकीपटूंचा वापर केला त्यावरून रोहितचा निर्णय योग्य ठरल्याचे दिसून येते.
गोलंदाजांची चांगली कामगिरी
या स्पर्धेत भारतासाठी गोलंदाजांनी सर्वाधिक प्रभावित केले. पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारख्या मोठ्या संघांविरुद्ध गोलंदाजांनी ज्याप्रकारे कामगिरी केली ती वाखाणण्याजोगी होती. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखालील वेगवान गोलंदाजांनी विरोधी संघांना सुरुवातीपासूनच दडपणाखाली ठेवले, तर भारताला जेव्हा जेव्हा विकेटची गरज असते तेव्हा मधल्या षटकांमध्ये फिरकीपटूंनी आपली भूमिका चोख बजावली.
मनगटी फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला ग्रुप स्टेजमध्ये प्लेइंग-11 मध्ये स्थान देण्यात आले नाही, पण सुपर-8 टप्प्यातून त्याला संघात स्थान मिळाले. कुलदीपने पहिल्याच सामन्यापासून प्रभाव पाडला आणि प्रत्येक सामन्यात विकेट घेण्यात तो यशस्वी ठरला. अंतिम फेरीत हार्दिक पांड्याची कामगिरी दमदार राहिली आणि त्याने या सामन्यात तीन विकेट घेतल्या.
प्रशिक्षक म्हणून द्रविडची भूमिका
आयसीसी स्पर्धेत भारताच्या चांगल्या कामगिरीचे बरेच श्रेय मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना जाते. द्रविडच्या नेतृत्वाखाली संघाने 2022 टी-20 वर्ल्ड कपची उपांत्य फेरी गाठली होती, तर 2023 च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची अंतिम फेरी आणि एकदिवसीय वर्ल्ड कपची अंतिम फेरी गाठण्यातही ते यशस्वी ठरले.
भारत चॅम्पियन होऊ शकला नसला तरी द्रविडच्या नेतृत्वाखाली संघाने ज्या प्रकारे सातत्यानं बाद फेरी गाठली त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
एक युनिट म्हणून चांगली कामगिरी
कोणत्याही संघाने मोठ्या स्पर्धांमध्ये एकजूट होऊन खेळणे खूप महत्त्वाचे असते. एकदिवसीय वर्ल्ड कपनंतर भारतीय संघाने यावेळी टी-20 वर्ल्ड कपतही एक युनिट म्हणून चांगली कामगिरी केली. जेव्हा सलामीवीर संघांला चांगली सुरुवात करण्यात अपयशी ठरली तेव्हा सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील मधल्या फळीतील फलंदाजांनी जबाबदारी स्वीकारली आणि संघाला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत नेण्यात योगदान दिले.
त्याचवेळी फलंदाजी आक्रमण पाकिस्तानविरुद्ध फ्लॉप ठरत असताना गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी करत संघाला विजयापर्यंत नेले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सुपर-8 टप्प्यात आणि इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत भारतीय संघ पूर्णपणे एकजूट दिसला आणि प्रत्येक खेळाडू एकमेकांच्या यशाचा आनंद साजरा करताना दिसला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.