USA vs WI T20 World Cup 2024 : जिंका नाहीतर बॅगा भरा! यजमान वेस्ट इंडीजचा संघ आज अमेरिकेशी लढणार

यजमान वेस्ट इंडीजच्या क्रिकेट संघाला टी-२० विश्‍वकरंडकातील सुपर आठ फेरीतील पहिल्याच लढतीत इंग्लंडकडून हार पत्करावी लागली.
United States vs West Indies T20 World
United States vs West Indies T20 WorldSAKAL
Updated on

United States vs West Indies T20 World Cup 2024 : यजमान वेस्ट इंडीजच्या क्रिकेट संघाला टी-२० विश्‍वकरंडकातील सुपर आठ फेरीतील पहिल्याच लढतीत इंग्लंडकडून हार पत्करावी लागली. याचसोबत दक्षिण आफ्रिकन संघाने अमेरिकन संघाला पराभूत केले. याच कारणामुळे आता वेस्ट इंडीज व अमेरिका या दोन्ही संघांना टी-२० विश्‍वकरंडकाच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याचे आव्हान कायम ठेवण्यासाठी विजय ‍आवश्‍यक आहे. वेस्ट इंडीजचा संघ आज (ता. २२) अमेरिकन संघाशी लढणार आहे. या लढतीतील पराभूत होणाऱ्या संघाचे आव्हान संपुष्टात येण्याची दाट शक्यता आहे.

वेस्ट इंडीज संघाने साखळी फेरीच्या लढतींमध्ये घवघवीत यश संपादन केले. वेस्ट इंडीजचा संघ क गटात आठ गुणांसह अव्वल स्थानावर राहिला. सुपर आठ फेरीच्या पहिल्याच लढतीमध्ये मात्र त्यांना आपला चांगला फॉर्म कायम राखता आला नाही. इंग्लंडविरुद्धच्या लढतीत त्यांच्या फलंदाजांनी तब्बल ५१ चेंडू वाया घालवले. या चेंडूंवर एकही धाव घेता आली नाही, तसेच फलंदाज एकेरी-दुहेरी धावा काढण्यातही अपयशी ठरले. याचा फटका त्यांना याप्रसंगी बसला.

रोवमॅन पॉवेल याच्या नेतृत्वात टी-२० विश्‍वकरंडकात सहभागी होत असलेल्या वेस्ट इंडीजचा संघामध्ये निकोलस पूरन, आंद्रे रसेल यांच्यासारखे सामन्याला क्षणार्धात कलाटणी देणारे आक्रमक फलंदाज आहेत. मागील लढतीत ब्रँडन किंगला दुखापत झाली. त्यामुळे त्याच्या खेळण्यावर प्रश्‍नचिन्ह आहे. किंग तंदुरुस्त झाला नाही, तर शिमरोन हेटमायर याला वेस्ट इंडीजच्या संघात संधी मिळू शकते. अकील होसेन, अल्जारी जोसेफ, गुदाकेश मोती, ओबेड मॅकॉय यांना गोलंदाजीत ठसा उमटवावा लागणार आहे.

‘त्या’ लढतीनंतर विजयापासून दूर

सह यजमान म्हणून स्पर्धेत सहभागी झालेल्या अमेरिकन संघाने सुपर आठ फेरीमध्ये प्रवेश करून सर्वांनाच धक्का दिला. अमेरिकन संघाने साखळी फेरीच्या पहिल्या लढतीत कॅनडा, तर दुसऱ्या लढतीत पाकिस्तानवर विजय मिळवला. पाकिस्तानवर मात केल्यानंतर मात्र अमेरिकन संघाला या स्पर्धेत आतापर्यंत विजय मिळवता आलेला नाही. भारत व दक्षिण आफ्रिका या संघांनी त्यांना पराभूत केले, तसेच आयर्लंडविरुद्धची लढत पावसामुळे रद्द करण्यात आली. या निराशेला मागे टाकत अमेरिकन संघ पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला असेल.

अव्वल दर्जाचे क्रिकेट खेळल्यास जगातील कोणत्याही संघाला हरवण्याची क्षमता आमच्या संघात आहे, मात्र गोलंदाजी विभागात आम्हाला सुधारणा करावी लागणार आहे. फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तीनही बाबींमध्ये शिस्त दाखवण्याची गरज आहे.

- ॲरोन जोन्स, पर्यायी कर्णधार, अमेरिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.