West Indies vs New Zealand T20 World Cup 2024 : सलामीच्या लढतीत अफगाणिस्तान संघाकडून पराभूत झाल्यामुळे संकटात सापडलेला न्यूझीलंडचा संघ आज यजमान वेस्ट इंडीजचा सामना करणार आहे. टी-२० विश्वकरंडकातील क गटातील आव्हान कायम राखण्यासाठी न्यूझीलंडच्या संघाला या लढतीत विजय मिळवणे गरजेचे आहे.
आणखी एका पराभवाने त्यांच्या ‘सुपर आठ’ फेरीमध्ये प्रवेश करण्याच्या आशांना सुरुंग लागू शकणार आहे. वेस्ट इंडीज संघ मात्र विजयाच्या हॅट्ट्रिकसह पुढल्या फेरीत पोहोचण्यासाठी सज्ज झाला असेल.
न्यूझीलंड संघाची गेल्या काही एकदिवसीय तसेच टी-२० विश्वकरंडकातील कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. २०१५, २०१९ व २०२३ या एकदिवसीय आणि २०१६, २०२१ व २०२२ या टी-२० विश्वकरंडकाच्या उपांत्य फेरीत पोहोचण्यात न्यूझीलंडला यश मिळाले आहे. त्यामुळे यंदाच्या सलामीच्या लढतीतील अफगाणिस्तानविरुद्धचा पराभव पटण्यासारखा नाही. या लढतीत न्यूझीलंडचा डाव ७५ धावांवरच आटोपला. त्यामुळे त्यांच्यावर ८४ धावांनी पराभवाची नामुष्की ओढवली. न्यूझीलंडच्या दोनच फलंदाजांना दुहेरी आकडी धावा करता आल्या. एवढेच नव्हे तर गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या दोन्ही बाबींमध्येही त्यांच्याकडून सुमार कामगिरी करण्यात आली.
वेस्ट इंडीजचा संघ मात्र छान खेळ करीत आहे. सलामीच्या लढतीत पापुआ न्यू गिनी संघाने कडवी झुंज दिली, पण पुढल्या लढतीत वेस्ट इंडीजने युगांडावर १३४ धावांनी दिमाखदार विजय मिळवला. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास नक्कीच उंचावला असेल. आता न्यूझीलंडवर विजय मिळवल्यानंतर त्यांना ‘सुपर आठ’ फेरीमध्ये पोहोचण्याची आस बाळगता येऊ शकणार आहे.
बांगलादेश - नेदरलँड्समध्ये झुंज
बांगलादेश - नेदरलँड्स यांच्यामध्ये आज (ता. १३) टी-२० विश्वकरंडकातील ड गटातील लढत रंगणार आहे. या लढतीत विजय मिळवणारा संघ चार गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचणार आहे. त्यामुळे साहजिकच त्या संघाला ‘सुपर आठ’ फेरीमध्ये प्रवेश करण्याची संधी असणार आहे. आव्हान कायम राखण्यासाठी दोन्ही संघांना या लढतीत विजयाची गरज आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.