Delhi Premier League: दिल्ली प्रीमियर लीगचा पहिला हंगाम सध्या सुरु आहे.या लीगमध्ये एकूण पाच संघानी भाग घेतला असून नुकताच साऊथ दिल्ली सुपरस्टार्स विरुद्ध नॉर्थ दिल्ली स्ट्राईकर्स यांच्यामध्ये सामना झाला.
या सामन्यामध्ये साऊथ दिल्ली सुपरस्टार्स संघाचा कर्णधार आयुष बदोनी याने कर्णधारपदाला साजेशी खेळी खेळली आहे. आयुषने ४४ चेंडूंमध्ये १६५ धावा ठोकल्या आहेत. या खेळीदरम्यान आयुषने ८ चौकारांसह १९ षटकार ठोकत नवा विक्रम केला.
कर्णधार आयुषने ट्वेंटी-२० सामन्याच्या एका डावामध्ये १९ षटकार मारून 'द युनिव्हर्स बॉस' नावाने ओळखल्या जाणाऱ्या ख्रिस गेलचा विक्रम मोडीत काढला आहे.
गेलच्या नावावर एका ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये एका डावामध्ये १८ षटकार मारण्याचा विक्रम होता. त्याचबरोबर साहिल चौहानने देखील गेलच्या या विक्रमाची बरोबरी केली होती. पण आयुषने एका डावामध्ये १९ षटकार मारून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
या विक्रमाबाबत बोलताना आयुष म्हणाला, "मी फक्त चेंडूला बॅटच्या टप्प्यात येण्यासाठी वेळ देत होतो, एका डावात मी १९ षटकार मारेन असे मला कधीच वाटले नव्हते. मी नेहमी चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न न करता, फक्त चेंडू मारण्यासाठी योग्य वेळ देण्यावर लक्ष केंद्रित करतो,"
आयुष आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून खेळतो. येत्या काही महिन्यात आयपीएलचा मेगा लिलाव होणार आहे. आयुषच्या या कामगिरीचा फायदा आयपीएल लिलावामध्ये होईल असे सांगितले जात आहे.
आयुषला याबाबत विचारले असता तो म्हणाला, "मी सध्या आयपीएलचा विचार करत नाही. सध्या माझ्यासाठी दिल्ली प्रीमियर लीग जिंकणे महत्वाचे आहे, त्यामुळे मी माझे पूर्ण लक्ष या लीगवर केंद्रित केले आहे."
पुढे तो असाही म्हणाला की, "मी आयपीएल खेळल्यामुळे इथे फलंदाजी करताना माझे काम सोपे झाले आहे. कारण आम्ही आयपीएलमध्ये जागतिक दर्जाच्या गोलंदाजांना सामोरे जातो. त्यामुळे या लीगमध्ये फलंदाजी करणे मला सोपे जात आहे. "
आयुषसोबतच प्रियांश आर्या या सलामीवीर फलंदाजाने ५० चेंडूंमध्ये ११२ धावांची शतकी खेळी केली होती. या खेळीदरम्यान प्रियांशाने १० चौकारांसह १० षटकार ठोकत गोलंदाजाना पूर्णतः दबावात टाकले होते.
महत्वाचे म्हणजे आयुष-प्रियांशच्या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी २८६ धावांची भागीदारी करून ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वात मोठ्या भागीदारीचा विक्रम केला आहे. याआधी हा विक्रम २५८ धवसह जपानचे सलामीवर लाचलन यामामोटो-लेक आणि केंडन कडोवाकी यांच्या नावे होता.
या सामन्यामध्ये साऊथ दिल्ली सुपरस्टार्सने आयुष-प्रियांश यांच्या खेळीच्या जोरावर ३०८ धावा उभारल्या. ट्वेंटी-२० सामन्यामध्ये एवढी मोठी धावसंख्या उभारणारा हा दुसरा संघ बनला आहे. पहिल्या स्थानावर ३१४ धावांसह नेपाळ संघ असून त्यांनी मंगोलिया संघाविरुद्ध या धावा उभारल्या होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.