Scotland vs Australia 1st T20I Travis Head: ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रॅव्हिस हेड याने काल ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये स्कॉटलंडच्या गोलंदाजांना बेक्कार चोपले. १५४ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने ९.४ षटकांत पार केले आणि अनेक विक्रम नावावर केले. ट्रॅव्हिस हेडने २५ चेंडूंत १२ चौकार व ५ षटकारांसह ८० धावांची खेळी केली. हेडच्या या फटकेबाजीमागे स्कॉटलंडचा कर्णधार मार्क वॅट याचं सामन्यापूर्वीचं विधान असल्याचे समोर येत आहे.
स्कॉटलंडने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद १५४ धावा केल्या. जॉर्ज मुन्सी ( २८), मॅथ्या क्रॉस ( २७) व कर्णधार रिची बेरिंग्टन ( २३) यांनी चांगला खेळ केला. ऑस्ट्रेलियाच्या सीन एबॉटने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या, तर झेव्हियर बार्टलेट व अॅडम झम्पा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात जॅक फ्रेझर-मॅकगर्क भोपळ्यावर बाद झाला.
त्यानंतर हेड व कर्णधार मिचेल मार्श या जोडीने तुफान फटकेबाजी केली. या दोघांनी पहिल्या सहा षटकांत ११३ धावा कुटल्या. ऑस्ट्रेलियाने ९.४ षटकांत ३ बाद १५६ धावा करून विजय पक्का मिळाला. मार्शने १२ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ३९ धावा केल्या. त्यानंतर जोश इंग्लिसने १३ चेंडूंत नाबाद २७ धावा केल्या.
तीन सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेपूर्वी स्कॉटलंडच्या मार्क वॅटने म्हटले होते की, रक्त सळसळतंय... आम्ही केवळ एका विजयासाठी नाही, तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका विजय मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
ट्रॅव्हिस हेडने ही प्रतिक्रिया वाचली होती आणि त्यावर तो म्हणाला की, “मी कारमध्ये वॅटचे विधान वाचले आणि माझ्यासोबत संघातील काही सहकारी होते. आम्ही सर्व हसलो. मी त्यांना म्हणालो लेट्स डू इट...''