India Squad for Test Series against New Zealand: भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२३-२५ स्पर्धेतील दोन महत्त्वाच्या मालिका बाकी आहेत. यातील न्यूझीलंडविरुद्धची मालिका १६ ऑक्टोबरपासून भारतात सुरू होणार आहे. तर दुसरी मालिका भारताला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाऊन खेळायची आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची शुक्रवारी (११ ऑक्टोबर) घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेसाठी रोहित शर्माकडे कर्णधारपद आहे, तर उपकर्णधार म्हणून जसप्रीत बुमराहकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
तथापि, सध्या अशी चर्चा आहे की २२ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला रोहित शर्मा मुकण्याची शक्यता आहे. मिडिया रिपोर्ट्सनुसार तो वैयक्तिक कारणामुळे कसोटीत खेळू शकणार नाही, अशी माहिती बीसीसीआयला रोहितने दिली आहे.
जर त्याचं काम लवकर झालं, तर तो पहिल्या सामन्यात खेळूही शकतो. अशात जर रोहित पहिल्या सामन्यासाठी अनुपस्थित राहिला, तर त्याच्याजागेवर भारतीय संघाचे नेतृत्व कोण करणार असेही प्रश्न उपस्थित झाले होते.
बीसीसीआयने शुभमन गिलकडे वनडे आणि टी२० संघाने उपकर्णधारपद दिले आहे. तसेच त्याच्याकडे भविष्यातील कर्णधार म्हणूनही पाहिले जात आहे. अशात त्याच्याकडे रोहित अनुपस्थितीत कर्णधारपदाची जबाबदारी दिली जाणार का असा प्रश्न उभा राहिला होता. ऋषभ पंतकडेही संभावित कर्णधार म्हणून पाहिले जात होते.
मात्र आता न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी निवड समितीने बुमराहकडे उपकर्णधारपद सोपवल्याने एकप्रकारे हा संदेशही दिला आहे की रोहितच्या अनुपस्थितीत कसोटीमध्ये बुमराह भारताचे नेतृत्व करू शकतो.
त्यामुळे जर रोहित ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटीत खेळला नाही, तर बुमराह भारताचे प्रभारी कर्णधारपद सांभाळण्याची दाट शक्यता आहे. बुमराहने यापूर्वी २०२२ मध्ये इंग्लंड दौऱ्यात एका कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व केले होते.
दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात फार बदल करण्यात आलेले नाहीत. यंदाही श्रेयस अय्यरला कसोटी संघात संधी देण्यात आलेली नाही.
तसेच यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान हे संघात कायम आहेत, तर ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेल यांच्याकडे यष्टीरक्षकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. वेगवान गोलंदाज आकाश दीपलाही संघात कायम करण्यात आले आहे.
असा आहे भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप
राखीव- हर्षित राणा, मयंक यादव, नितीश कुमार रेड्डी, प्रसिद्ध कृष्णा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.