नवी दिल्ली : कितीही तंत्रज्ञानाचा वापर केला तरी काही क्षणी अचूक निर्णय देताना टीव्ही आणि मैदानावरील पंचांची तारांबळ उडत असते; परंतु यंदा आयपीएलमध्ये नव्या रिव्ह्यू प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे, त्यामुळे निर्णयात अधिकाधिक सुस्पष्टता दिसून येईल. येत्या शुक्रवारपासून सुरू होणारी आयपीएल नव्या तंत्रज्ञान रिव्ह्यू प्रणालीचा नवा आविष्कार असेल. तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली की टीव्ही ब्रॉडकास्ट डायरेक्टर हा महत्त्वाचा रिप्ले दाखवण्यासाठी महत्त्वाचा घटक असायचा. आता नवे तंत्रज्ञान आणि प्रणालीमुळे हा घटक कालबाह्य होईल.
‘स्मार्ट रिव्ह्यू सिस्टिम’ असे या प्रणालीचे नाव आहे. टीव्ही पंचांसाठी आता थेट हॉक आय ऑपरेटरकडून थेट इनपूट्स मिळतील. विशेष म्हणजे, हे दोघेही एकाच रूममध्ये असतील. हॉक आयच्या अति जलद आठ कॅमेरातून घेण्यात आलेली चित्र टीव्ही पंचांसाठी तत्काळ उपलब्ध केले जातील. या अगोदर टीव्ही ब्रॉडकास्टर ऑपरेटरकडून मिळणाऱ्या व्हिज्युअलपेक्षा अधिक चित्र मिळतील, तसेच एकाच फ्रेंममध्ये वेगवेगळ्या स्क्रिन प्रतिमाही मिळतील, त्यामुळे टीव्ही पंचांना अचूक निर्णय घेणे अधिकाधिक सोपे होणार आहे. परिणामी, कोणावरही अन्याय होणार नाही.
उदाहणार्थ...
सीमारेषेवर हवेमध्ये झेल पकडण्यात आला. तर याअगोदर ब्रॉडकास्टरकडे दोन वेगवेगळ्या स्क्रिनमध्ये एकच प्रतिमा वेगवेगळ्या कोनातून पाहायला मिळत नव्हती. आता ते शक्य होणार आहे, त्यामुळे सीमारेषेवर हा झेल पकडला त्यावेळी क्षेत्ररक्षकाचे पाय सीमारेषेला लागले की नाही हे समजणार आहे. याचप्रमाणे ओव्हर थ्रो केलेला चेंडू चौकार गेला तर चेंडूफेक केली गेली त्यावेळी दोन्ही फलंदाज एकमेकांना क्रॉस झाले की नाही, या दोन्ही घटनांचा अचूक क्षण हॉक आय ऑपरेटर सादर करेल. २०१९च्या एकदिवसीय विश्वकरंडक अंतिम सामन्यात हाच क्षण निर्णायक ठरला होता. त्यावेळी पंचांकडे दोन्हीकडील एकाच क्षणाची प्रतिमा नव्हती, त्यामुळे इंग्लंडला ओव्हर थ्रोच्या चार धावा मिळाल्या, त्यामुळे त्यांना सामना टाय करता आला होता.
हॉक आयचे आठ कॅमेरे
आयपीएलच्या प्रत्येक सामन्यांसाठी प्रत्येकी आठ उच्च दर्जाचे आणि अति जलद (हाय स्पीड) असे आठ कॅमेरे असणार आहेत. यातील प्रत्येकी दोन-दोन कॅमेरे यष्टींच्या समोरासमोरील सीमारेषेवर असतील तर प्रत्येकी दोन कॅमेरे दोन्ही स्केअर लेग येथे असतील. गत आयपीएलपर्यंत हॉक आयचे कॅमेरे प्रामुख्याने बॉल ट्रॅकिंग (चेंडू पडल्यानंतरचा अनुमानित दिशा) आणि अल्ट्रा एज (बॅचची अति सूक्ष्म कडा) यासाठी वापरले जात होते. त्यामुळे याचा उपयोग पायचीत किंवा झेलचीतसाठीच होत होता. या वेळी यष्टिचीत, जमिनीलगतचे झेल किंवा ओव्हर थ्रो यासाठी ब्रॉडकास्टरर्स स्वतःचे कॅमेरे वापरत असायचे.
यष्टिचीतचा निर्णय लवकर मिळणार
यष्टिचीतच्या निर्णयासाठी टीव्ही पंचांची मदत घेताना चेंडू बॅटला लागला आहे की नाही हे प्रथम पाहिले जायचे, त्यानंतर अल्ट्रा एज पाहण्यासाठीही वेळ लागायचा. (झेलचित आहे की नाही हे तपासण्यासाठी) आता हॉक आय ऑपरेटर एकाच फ्रेंमध्ये दोन वेगवेगळ्या स्क्रिन तसेच एकाच क्षणाच्या प्रतिमा सादर करेल, त्यामुळे बॅट आणि चंेडू यातील अंतर किती आहे. किंवा चेंडूचा बॅटला स्पर्श झाला आहे की नाही, हे तेथेच स्पष्ट होईल. त्याच वेळी यष्टिचीतच्या क्षणाचीही प्रतिमा सादर केली जाईल. परिणामी, हा निर्णय लवकर मिळेल. यष्टिचीतसाठी समोरासमोरच्या प्रतिमा सादर केल्या जातील, त्यामुळे बेल्स कधी उडवली आणि त्याचवेळी फलंदाजाचा पाय कोठे होता हे एकाच वेळी स्पष्ट होईल. या अगोदर केवळ बाजूच्या अँगलमधून प्रतिमा दिली जात होती आणि यष्टींमधील कॅमेरातून पाय कोठे आहे, हे तपासले जायचे; पण त्यासाठी वेगवेगळ्या प्रतिमा पाहायला लागायच्या.
पायचीत निर्णयातही सुलभता
पायचीतचा निर्णय हा कधी कधी फार वेळ घेत असतो, बॅटची कडा, चेंडूचा टप्पा आणि दिशा आणि त्यानंतर बॉल ट्रॅकिंग असे सर्व घटक तपासले जायचे; पण आता हॉक आय कॅमेरा चेंडू नेमका कोठे पडलाय हे लगेचच दर्शवेल आणि त्यानंतर बॉल ट्रॅकिंगचा पर्याय तपासण्यात येईल. त्यामुळे या निर्णयात अधिक सुलभता येईल आणि वेळेचीही बचत होईल. जमिनीलगतचे झेल... जमिनीलगत पकडण्यात येणारे झेल नेहमीच वादग्रस्त ठरत असतात अनेक रिप्ले पाहूनही झेल पकडला आहे की नाही हे समजत नसते; परंतु या स्मार्ट रिव्ह्यू प्रणालीमध्ये हॉक आय एकच फ्रेम समोरून दाखवेल आणि हे कॅमेरे अधिक उच्च प्रतिचे असल्यामुळे टीव्ही पंच स्वतः झूम करून (चित्र मोठे करून) हव्या त्या कोनातून प्रतिमा पाहू शकेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.