David Warner lifetime captaincy ban lifted: साल २०१८ मध्ये क्रिकेट विश्वात चेंडू छेडछाड प्रकरणाने खळबळ उडाली होती. ऑस्ट्रेलियन संघातील खेळाडूंकडून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊन कसोटीत चेंडू छेडछाडीचा प्रयत्न झाला होता.
या प्रकरणात तत्कालिन कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि फलंदाज कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट यांना शिक्षा झाली होती. त्यातही वॉर्नर या प्रकरणातील सुत्रधार असल्याचे समोर आले होते. त्यामुळे वॉर्नरवर स्मिथ आणि बॅनक्रॉफ्टपेक्षा मोठी शिक्षा सुनावली, ती शिक्षा म्हणजे त्याच्यावर आजीवन नेतृत्वासाठी बंदी घालण्यात आली होती.
मात्र आता या प्रकरणाच्या ६ वर्षांनंतर त्याची आजीवन बंदी रद्द करण्याचा निर्णय क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घेतला आहे. त्यामुळे आता वॉर्नर पुन्हा नेतृत्व करताना दिसू शकतो.
तथापि, लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की वॉर्नर या वर्षाच्या सुरुवातीलाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. पण तो टी२० लीगमध्ये मात्र खेळत आहे. त्यामुळे आता तो बिग बॅश लीग स्पर्धेत सिडनी थंडर्स संघाचे नेतृत्व करताना दिसू शकतो.