Deepak Hooda Controversy in Ranji Trophy 2024: आजपासून रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या चौथ्या फेरीच्या सामन्यांना सुरूवात झाली. रणजी ट्रॉफी स्पर्धेत वाद पाहायला मिळणे हे काय नवीन नाही. यावेळी राजस्थान क्रिकेट संघामधील अंतर्गत वाद समोर आला आहे. ज्यामध्ये भारतीय संघाचा फलंदाज दीपक हुडाही सहभागी आहे. दीपक हुडा रणजी ट्रॉफी स्पर्धेत राजस्थान संघाचे नेतृत्व करत आहे. हुडा राजस्थानच्या निवड समितीच्या निर्णयावर नाराज असल्याची माहिती सुत्रांमार्फत मिळत आहे.
राजस्थान स्पर्धेतील चौथा सामना हैद्राबादविरूद्ध खेळत आहे. निवड समितीचा निर्णय न पटल्यामुळे जयपूरमध्ये सामन्याच्या पहिला दिवसाच्या समाप्तीनंतर तो सराव सत्रासाठी उपस्थित राहिला नाही.
रणजी ट्रॉफी २०२४-२५ स्पर्धेच्या सुरूवातीवासूनच या वादाला सुरूवात झाली. प्रभारी निवड समिती, कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्यात खेळाडू निवडीवरून अनेक मतभेद झाले आहेत. परंतु आज (बुधवारी) गोष्टी नियंत्रणाबाहेर गेल्या, कर्णधार दीपक हुडा सराव सत्रासाठी अनुपस्थित राहिला. तो प्रभारी निवड समिती सदस्य आणि क्रीडा मंत्री (राज्यवर्धन सिंह राठोर) यांच्याशी फोनवर बोलण्यात व्यस्त होता, असे सुत्रांमार्फत कळत आहे. इतकेच नाही तर, या वादामुळे प्रभारी निवड समिती सदस्याने राजीनामा देण्याची धमकी दिल्याचेही सुत्राने सांगितले.
प्रभारी निवड समितीचे अध्यक्ष जयदीप बिहान व सहाय्यक रतन सिंग, पवन गोयल, धर्मवीर सिंग शेखावत, हरीश सिंग यांनी यांनी या प्रकरणाचा खुलासा केला. धर्मवीर म्हणाले "जेव्हा अनेक लोक निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत सहभागी असतात तेव्हा अशा गोष्टी घडतात. जितकी लोकं जास्त, तितकी मते जास्त. कर्णधार दीपक हुडाला संघात यष्टिरक्षक-फलंदाज कुणाल सिंग राठोड हवा होता. पण, गेल्या तीन सामन्यांमध्ये त्याने केवळ एक अर्धशतक ठोकले आहे व काही खास कामगिरी केलेली नाही. त्यामुळे त्याला संघातून वगळणे हा निवड समितीचा निर्णय चुकीचा नाही आणि हा वादही नाही."