Duleep Trophy 2024 Ishan Kishan : टीम इंडियात पुनरागमनासाठी प्रयत्नशील असलेल्या इशान किशनने दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीत खणखणीत खेळ केला. टीम इंडियात पुनरागमनासाठी त्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. बुची बाबू निमंत्रित स्पर्धेत झारखंडचे नेतृत्व करताना पहिल्याच सामन्यात शतक झळकावले होते. आज दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीतही भारत क संघासाठी त्याने शतकी खेळी केली.
ऋतुराज गायकवाडच्या भारत क संघाने भारत ब संघाविरुद्ध ५३ षटकांत २ बाद २३० धावा केल्या आहेत. ऋतुराज पाय मुरगळल्यामुळे रिटायर्ड हर्ट झाला. बी साई सुदर्शन ( ४३) व रजत पाटीदार ( ४०) यांनी चांगली खेळी करून संघाला सावरले. त्यानंतर इशान किशन व बाबा इंद्रजित यांनी फटकेबाजी केली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १८९ धावा जोडल्या.
या वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरून मानसिक थकवा सांगून माघारी परतलेला इशान नंतर देशांतर्गत क्रिकेटमध्येही नव्हता खेळला. त्यामुळे बीसीसीआयने वार्षिक करारातून त्याला वगळले. त्यानंतर तो मागील महिन्यात बुची बाबू निमंत्रित स्पर्धेत खेळला आणि शतकही झळकावले. आज त्याने १२६ चेंडूंत ८८.१०च्या सरासरीने १४ चौकार व ३ षटकारांसह १११ धावांची खेळी केली. मुकेश कुमारने त्याला बाद केले.