Duleep Trophy 2024 Ruturaj Gaikwad: दुलीप ट्ऱॉफीच्या दुसऱ्या फेरीला आजपासून सुरुवात झाली आणि भारत क संघाच्या इशान किशनने मैदान गाजवले. इशानने शतकी खेळी करून संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली आणि त्याला बाबा अपराजितची उत्तम साथ मिळाली. पण, या सामन्याची सुरुवात अनपेक्षित झाली होती. कर्णधार ऋतुराज गायकवाड दुसऱ्याच चेंडूवर रिटायर्ड हर्ट होऊन माघारी परतला... त्यामुळे तो फलंदाजीला येतो की नाही, याबाबत शंकाच होती. पण, ६ तासानंतर तो मैदानावर उतरला अन्...
ऋतुराज पाय मुरगळल्यामुळे रिटायर्ड हर्ट व्हावे लागले होते. त्याने मुकेश कुमारने टाकलेला पहिलाच चेंडूवर चौकार खेचला, परंतु दुसऱ्या चेंडूवर धाव घेताना त्याचा पाय मुरगळला. त्यामुळे त्याला रिटायर्ड हर्ट व्हावे लागले. बी साई सुदर्शन ( ४३) व रजत पाटीदार ( ४०) यांनी चांगली खेळी करून संघाला सावरले. त्यानंतर इशान किशन व बाबा इंद्रजित यांनी फटकेबाजी केली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १८९ धावा जोडल्या.
इशानने १२६ चेंडूंत १४ चौकार व ३ षटकारांसह १११ धावांची खेळी केली. मुकेश कुमारने त्याला बाद केले. इशानची विकेट पडताच ऋतुराज पुन्हा मैदानावर आला आणि संघाचा जोश वाढला. पण, त्याचवेळी बाबा अपराजित बाद झाला. त्याने १३६ चेंडूंत ९ चौकारांसह ७८ धावांची खेळी करून माघारी परतला. पाठोपाठ अभिषेक पोरेलही ( १२) बाद झाला.
अशा वेळी ६ तासांनी पुन्हा फलंदाजीला आलेल्या ऋतुराजने पहिला दिवस संपेपर्यंत खिंड लढवली. त्याने ५० चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ४६ धावांची नाबाद खेळी करून संघाला दिवसअखेर ७९ षटकांत ५ बाद ३७५ धावांपर्यंत पोहोचवले. भारत ब संघाकडून मुकेश कुमारने तीन विकेट्स घेतल्या.