कॅरेबियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये शनिवारी पहाटे थरारक सामन्याचा आनंद क्रिकेट चाहत्यांना लुटता आला. अँटिग्वा अँड बर्बुडा फॅलकॉन्स विरुद्ध गयाना अॅमेझॉन वॉरियर्स सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रोमहर्षक राहिला... विजयासाठी १६९ धावांचा पाठलाग करणाऱ्या वॉरियर्सना शेवटच्या चेंडूवर ४ धावा हव्या होत्या. पाकिस्तानी गोलंदाज मोहम्मद आमीर समोर होता, परंतु ड्वेन प्रेटोरियसने लाँग ऑफच्या दिशेने खणखणीत फटका खेचला आणि संघाला थरारक विजय मिळवून दिला. आमीरने टाकलेल्या त्या २०व्या षटकात वॉरियर्सच्या फलंदाजांनी १८ धावा चोपल्या.
फॅलकॉन्सने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १६८ धावा उभ्या केल्या. फखकर जमान आणि इमाद वासीम यांनी प्रत्येकी ४० धावा केल्या. कोफी जेम्सने ३७ धावांचे योगदान दिले. जमान व टेड्डी बिशॉप यांनी फॅलकॉन्ससाठी सलामीला १० धावांची भागीदारी केली आणि ती ट्वेंटी-२०तील संघाकडून सर्वाधिक भागीदारी ठरली. फॅलकॉन्ससाठी सर्वाधिक ४ षटकार मारण्याचा विक्रमही जमानने आज नावावर केला. जमान व कोफी यांनी ७५ धावा जोडल्या आणि ही फॅलकॉन्ससाठी कोणत्याही विकेटसाठीची सर्वोत्तम भागीदारी ठरली. वॉरियर्सच्या गुदाकेश मोतीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात सलामीवीर गुदाकेश ६ धावांवर बाद झाला. रहमनुल्लाह गुरबाज ( २०) याला फार चांगली खेळी करता आली नाही. शिमरोन हेटमायर ( १९), आझम खान ( ९), किमो पॉल ( १०) हे अपयशी ठरले. शे होपने ३४ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह ४१ धावांची खेळी केली. रोमारिओ शेफर्ड व ड्वेन प्रेटोरियस यांनी वॉरियर्ससाठी जोरदार खेळ केला. शेफर्ड १६ चेंडूंत ४ षटकारांसह ३२ धावांवर माघारी परतला.
संघाला विजयासाठी शेवटच्या षटकात १६ धावा हव्या असताना प्रेटोरियसने ०,४,४,०,४,६ अशी फटकेबाजी करून मोहम्मद आमीरची धुलाई केली. वॉरियर्सने ७ बाद १७१ धावा करून विजय पक्का केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.