England vs Sri Lanka, 3rd Test: श्रीलंका संघाने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना ८ विकेट्सने जिंकत व्हाईटवॉश टाळला आहे. पहिल्या दोन सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेवर पूर्ण वर्चस्व राखले होते. त्यामुळे त्यांनी मालिकेतील विजय निश्चित केला. मात्र, तिसऱ्या कसोटीत श्रीलंकेने चांगले पुनरागमन करत इंग्लंडला पराभवाचा धक्का दिला.
लंडनमधील केनिंग्टन ओव्हलवर झालेल्या तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेसमोर २१९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग श्रीलंकेने २ विकेट्स गमावत ४०.३ षटकात पूर्ण केला. विशेष म्हणजे पहिल्या डावातील पिछाडीनंतरही श्रीलंकेने हा सामना जिंकण्यात यश मिळवले आहे.
श्रीलंकेकडून दुसऱ्या डावात सलामीवीर पथुम निसंकाने आक्रमक खेळ करत नाबाद शतक केले. त्याने १२४ चेंडूत १३ चौकार आणि २ षटकारांसह १२७ धावांची नाबाद खेळी केली. त्याची ही खेळी श्रीलंकेला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची ठरली.
त्याला कुशल मेंडिस आणि अँजेलो मॅथ्यूज यांनीही चांगली साथ दिली. मेंडिसने ३९ धावा केल्या, तर मॅथ्युजने ३२ धावांची नाबाद खेळी केली. या डावात इंग्लंडकडून ख्रिस वोक्स आणि गस ऍटकिन्सन यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.