Ravi Shastri predicts Border-Gavaskar series: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या कसोटी मालिकेची सर्वांना उत्सुकता आहे. कारण, तब्बल ३३ वर्षांनी IND vs AUS यांच्यात ५ सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये होणाऱ्या या मालिकेत विजयाचे दावे आतापासून केले जात आहेत. त्यात ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग ( Ricky Ponting ) याने यजमान संघ ३-१ अशी बाजी मारेल असा दावा केला आहे. पण, त्याला आता भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
Border-Gavaskar Trophy यंदाही भारतीय संघच जिंकेल असा विश्वास रवी शास्त्री यांनी व्यक्त केला आहे. ऑस्ट्रेलियात झालेल्या मागील दोन बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत भारताने ऐतिहासिक विजयांची नोंद केली होती. ऑस्ट्रेलियाने घरच्या मैदानावर २०१५ मध्ये भारताला ( २-०) शेवटचे पराभूत केले होते. त्यानंतर विराटच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियात २०१९ मध्ये भारताने २-१ अशी मालिका जिंकली होती आणि अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली २०२०-२१ मध्ये ऐतिहासिक मालिका विजय मिळवला होता.
ऑस्ट्रेलियाने याचा वचपा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा आणि वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील विजयाने घेतला. आता रिकी पाँटिंग याने आगामी मालिकेत ऑस्ट्रेलिया ३-१ असा विजय मिळवेल, असा दावा केला आहे. त्यावर शास्त्रींनी भाष्य केले आहे.
भारतीय संघात विराट कोहली, रोहित शर्मा असे दमदार फलंदाज आहेत आणि त्यांना बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी पुन्हा आपल्याकडे ठेवायची असेल, तर या फलंदाजांना त्यांचा खेळ दाखवावा लागेल, असे शास्त्री म्हणाले.''ऑस्ट्रेलियात बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी होणारी पाच सामन्यांची मालिका ही अद्भुत असेल. पण, भारताने दोनवेळा ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियामध्ये पराभूत केले आहे, हे विसरता कामा नये. ऑस्ट्रेलियाला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकून जवळपास दशक उलटले आहे. त्यामुळेच IND vs AUS मालिकेची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत,''असेही ते म्हणाले.
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा ( India vs Australia, Border-Gavaskar Trophy 2024-25)
भारत वि. ऑस्ट्रेलिया, पहिली कसोटी: २२ ते २६ नोव्हेंबर, पर्थ
भारत वि. ऑस्ट्रेलिया, दुसरी कसोटी: ६ ते १० डिसेंबर, एडिलेड
भारत वि. ऑस्ट्रेलिया, तिसरी कसोटी: १४ ते १८ डिसेंबर, ब्रिस्बेन
भारत वि. ऑस्ट्रेलिया, चौथी कसोटी: २६ ते ३० डिसेंबर, मेलबर्न
भारत वि. ऑस्ट्रेलिया, पाचवी कसोटी: ३ ते ७ जानेवारी, २०२५, सिडनी
त्यांनी पुढे सांगितले की,''ही मालिका अटीतटीची होईल हे निश्चित आणि भारतीय संघ हॅटट्रिक साजरी करण्याची शक्यता अधिक आहे. कारण, त्यांच्याकडे तंदुरुस्त गोलंदाज आहेत आणि फलंदाजांनी दमदार खेळ केल्यास, ऑस्ट्रेलियाला पुन्हा पराभूत करू शकतो.''
ऑस्ट्रेलियाचा संघही पलटवार करण्यासाठी तयार आहे, असा इशाराही शास्त्री यांनी दिला. ''ऑस्ट्रेलियाला बदला घ्यायचा आहे. ते त्यासाठी तहानलेले आहेत आणि भारतीय संघाला पराभूत करण्यासाठी ते सर्व प्रयत्न करतील. कारण टीम इंडियाने त्यांना घरी दोनवेळा पराभूत केले आहे. त्यांच्याकडे दिग्गज गोलंदाजांची फौज आहे. शिवाय नॅथन लियॉनसारखा अव्वल फिरकीपटू आहे. त्यामुळे या मालिकेत भारताची फलंदाजी विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा जलदगती मारा, असा हा सामना असेल,''असेही शास्त्री म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.