Sourav Ganguly : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने बुधवारी सायबर सेलमध्ये एका यूट्यूबरविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. यूट्यूब व्हिडिओद्वारे त्याचा अपमान केल्याबद्दल गांगुलीने सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे.
बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने सिनेबॅप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मृण्मय दास नावाच्या बंगाली यूट्यूबरविरुद्ध अब्रुनुकसानीची तक्रार दाखल केली आहे. यूट्यूबरने त्याच्याविरुद्ध अश्लील आणि अपशब्द वापरल्याचे तक्रारीमध्ये नमूद केले आहे.
गांगुलीचा सचिव तान्या चॅटर्जी याने कोलकाता सायबर सेलला लेखी तक्रार दिली आहे. या तक्रारीत त्याने यूट्यूबरचे चॅनल आणि नाव देखील नमूद केले आहे. त्याने सायबर सेलला एक ईमेल पाठवला, ज्यामध्ये एका व्हिडिओची लिंकही शेअर केली आहे. ईमेलबाबत सायबर अधिकाऱ्याने सांगितले की, "आम्हाला ईमेल आला असून आम्ही त्याची चौकशी करत आहोत."
गांगुलीच्या सचिवाने ईमेलमध्ये लिहिले की,"मी या ईमेलद्वारे मृण्मय दास नावाच्या व्यक्तीची तक्रार करत आहे. हे सायबर बुलिंग आणि बदनामीचे प्रकरण असून या व्यक्तीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये सौरव गांगुलीला लक्ष्य करत अपशब्द वापरण्यात आले आहेत. त्याच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी करत आहे, जी त्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवते."
"व्हिडिओचा संदर्भ केवळ गांगुलीवरील हल्ल्याचाच नाही तर सन्मानाचाही भंग करतो. आम्ही या प्रकरणात तुमच्या मदतीची विनंती करतो. कृपया गांगुलीची बदनामी आणि धमकावल्याबद्दल दास याच्यावर योग्य कायदेशीर कारवाई करावी अशी विनंती करतो. आम्हाला विश्वास आहे की सायबर विभाग या समस्या सोडवण्यासाठी जलद आणि आवश्यक पाऊले उचलेल."
भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या गांगुलीने भारतासाठी ११३ कसोटी आणि ३११ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत ४२.१८ च्या सरासरीने ७२१२ धावा आणि एकदिवसीय सामन्यात ४०.४३ च्या सरासरीने ११३६३ धावा बनवल्या आहेत. गांगुलीने आयपीएलमध्येही नेतृत्व केले आहे. आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि पुणे वॉरियर्सकडून खेळला होता. त्याने आयपीएलमध्ये ५९ सामने खेळून ३६३ धावा केल्या आहेत.