India Tour of Australia: भारतीय क्रिकेट संघाला जुलै २०२४ मध्ये गौतम गंभीरच्या रुपात नवा प्रशिक्षक मिळाला होता. २०२४ टी२० वर्ल्ड कप राहुल द्रविड आणि त्याच्या कोचिंग टीमच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने जिंकला. पण या स्पर्धेनंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोर, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे यांचा कार्यकाळ संपला.
त्यामुळे या स्पर्धेनंतर बीसीसीआयने गौतम गंभीरला मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले. त्याच्यासह कोचिंग टीममध्ये मॉर्ने मॉर्केल, अभिषेक नायर, रायन डोईशेट यांचीही नियुक्ती केली. तसेच क्षेत्ररक्षक प्रशिक्षक म्हणून टी दिलीप यांना कायम केले. मात्र नव्या कोचिंग टीमच्या मार्गदर्शनाखाली भारताची कामगिरी संमिश्र राहिली.
पहिल्या चार महिन्यातच भारताला श्रीलंकेविरुद्ध वनडेत व्हाईटवॉश स्विकारावा लागला, तर कसोटीत मायदेशात पहिल्यांदाच न्यूझीलंडविरुद्ध मालिका ०-३ अशा फरकाने गमावण्याची नामुष्की ओढावली. याशिवाय टी२० संघही बऱ्याच प्रमाणात बदलण्यात आला.