IND vs AFG ACC Men's T20 Emerging Teams Asia Cup : इमर्जिंग आशिया कप ट्वेंटी-२० स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात अफगाणिस्तानने भारताचा दणदणीत पराभव केलो. सामन्यात धुव्वाधार फलंदाजी करत अफगाणिस्तानने भारताला २०७ धावांचे लक्ष्य दिले. पण, अफगाणिस्तानच्या गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांनी शरणागती पत्कारली. रमणदीपव्यतिरीक्त भारताच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. अफगाणिस्तानने भारताला १८६ धावांवर रोखले आणि सामना २० धावांनी जिंकला. सर्व सामने जिंकून उपांत्य फेरी गाठलेल्या भारताला अफगाणिस्तान समोर पराभवाचा सामना करावा लागला आणि अफगाणिस्तानने अंतिम फेरीत प्रवेश केला.
अफगाणिस्तान संघ आक्रमक पवित्रा घेऊन मैदानात उतरला. सलामिवीर सेदीकुल्लाह अटल व झुबाईद अकबरी यांनी भारतीय गोलंदाजांना हैरान करून सोडले. १२ व्या षटकात अफगाणिस्तानच्या १०० धावा पुर्ण झाल्या आणि अफगाणी फलंदाज आधिक आक्रमक झाले.
१४ व्या षटकात भारताला पहिला विकेट घेण्यात यश आले. आकिब खानने झुबाईद अकबरीला बाद केले. झुबाईदने ४१ चेंडूत ६४ धावांचे योगदान दिले. सेदीकुल्लाह अटल व झुबाईद अकबरीने पहिल्या विकेटसाठी १३७ धावांची मोठी भागीदारी केली. झुबाईद नंतर फलंदाजीसाठी आलेला करीम जनतही त्याच आक्रमकतेने फलंदाजी करत होता. पण, १८व्या षटकात सेदीकुल्लाह ५२ चेंडूत ८३ धावा करून बाद झाला. सेदीकुल्लाहच्या विकेटनंतर अफगाणीस्तानच्या खेळीला ब्रेक लागेल असे वाटले होते. पण त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या प्रत्येक फलंदाजाने त्याच आक्रमकतेने फलंदाजी सुरू ठेवली आणि भारताला २०७ धावांचे आव्हान दिले.
लक्ष्य मोठे असल्यामुळे भारतीय फलंदाजांनीही आक्रमक भूमीका घेतली. पण मोठा फटका खेळायच्या नादात सलामीवीर अभिषेक शर्मा ७ धावांवर बाद झाला. मागोमाग प्रभसीमरन सिंगच्या (१९) रुपाने भारताला दुसरा धक्का मिळाला. त्यानंतर भारताच्या खेळीचा वेग कमी झाला. त्यात सहाव्या षटकात अब्दुल रहमानच्या गोलंदाजीवर शरफुद्दीन अश्रफने सुंदर झेल केला आणि भारतीय कर्णधार तिलक वर्माला (१६) माघारी पाठवले.