IND vs NZ 1st Test day 1 Marathi Updates : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेली टीम इंडिया घरच्या मैदानावरील आणखी एका मालिका गाजवण्यासाटी सज्ज झाली आहे. कालचा पूर्ण दिवस पावसामुळे वाया गेल्यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ होतो की नाही, अशी भीती चाहत्यांमध्ये होती. कारण हवामानाच्या अंदाजानुसार आजही पावसाचा खोडा असेल. पण, टॉस ठरलेल्या वेळेत सकाळी ८.४५ वाजता झाला आणि भारताने तो जिंकला.
मधल्या फळीतील युवा फलंदाज शुभमन गिल याचे या सामन्यात खेळण्यावर प्रश्नचिन्ह होताच आणि तेच खरं झालं. गिलची मान व खांदा दुखत असल्याने तो या सामन्यात खेळणार नाही, हे स्पष्ट झालं. रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. गिल १०० टक्के फिट नसल्याने त्याला विश्रांती दिली गेली आहे आणि त्याच्या जागी संघात सर्फराज खान परतला आहे. सर्फराजने इराणी चषक स्पर्धेत द्विशतक झळकावून निवड समितीसमोर पेच निर्माण केलाच होता. गिलच्या दुखापतीने सर्फराजला संधी मिळाली. कुलदीप यादव तिसरा फिरकीपटू म्हणून प्लेइंग इलेव्हनमध्ये परतला आहे. आकाश दीपला विश्रांती दिली गेली आहे. लोकेश राहुल हा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणार आहे. न्यूझीलंडचा संघही फिरकीपटूंसह मैदानावर उतरला आहे. रवींद्र जडेजा आणि ग्लेन फिलिप्स हे दोन स्पिनिंग ऑल राऊंडर संघात आहेत.