India vs New Zealand Mumbai Test: मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या कसोटीत भारताकडून न्यूझीलंडविरुद्ध शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांनी शानदार फलंदाजी केली. परंतु, अन्य फलंदाजांना खेळपट्टीवर टिकाव धरता न आल्याने भारताने मोठी आघाडी घेण्याची संधी गमावली.
दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात भारताचा पहिला डाव ५९.४ षटकात २६३ धावांवर संपुष्टात आला. भारताकडे २८ धावांची आघाडी आहे. महत्त्वाचे म्हणजे या मालिकेत भारताने पहिल्यांदाच पहिल्या डावात आघाडी घेतली. दरम्यान, पहिल्या डावात एजाज पटेलने ५ विकेट्स घेतल्या.
या सामन्यात भारताने पहिल्याच दिवशी पहिल्या डावातील ४ विकेट्स गमावल्या होत्या. या चार विकेट्समध्ये रोहित शर्मा (१८), यशस्वी जैस्वाल (३०), विराट कोहली (४) आणि मोहम्मद सिराज (०) या फलंदाजांचा समावेश आहे. त्यामुळे भारतीय संघाने पहिल्या दिवस अखेर भारताने १९ षटकात ४ बाद ८६ धावा केल्या होत्या. पण त्यावेळी गिल ३१ धावांवर आणि पंत १ धावेवर नाबाद होते. याच धावसंख्येवरून दुसऱ्या दिवशी भारताने खेळायला सुरुवात केली.