India vs New Zealand Test: भारतीय क्रिकेट संघाला न्यूझीलंडविरुद्ध मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर तिसरा आणि अखेरचा कसोटी सामना खेळायचा आहे. या सामन्यात भारतीय संघाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भारताविरुद्ध कसोटी मालिकेतील पहिले दोन्ही सामने न्यूझीलंडने जिंकले आहेत.
न्यूझीलंडने बंगळुरूला झालेल्या पहिल्या कसोटीत ८ विकेट्सने विजय मिळवला, तर पुण्यात झालेल्या दुसऱ्या कसोटीत ११३ धावांनी विजय मिळवला. त्यामुळे न्यूझीलंडने मालिकेतील विजय निश्चित केला आहे. त्यामुळे भारताला तब्बल १२ वर्षांनंतर मायदेशात कसोटी मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला आहे.
आता न्यूझीलंडकडे भारताला व्हाईटवॉश देण्याची संधी आहे. न्यूझीलंडने जर तिसरा कसोटी सामनाही जिंकला, तर भारताला पहिल्यांदाच मायदेशात व्हाईटवॉश मिळेल.
या मालिकेतील पराभवाबाबत बोलताना भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर म्हणाला की तो उगीचच कौतुक करणार नाही, पराभवामुळे दु:ख झालं आहे. तसेच पराभवासाठी त्याने कोणालाही दोषी ठरवलेलं नाही.