IND vs NZ Test: रोहित शर्माच्या नेतृत्वात मैदानात उतरणाऱ्या भारतीय क्रिकेट संघावर न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका गमावण्याची आपत्ती ओढवली. मायदेशातील आपल्या वर्चस्वाला सुरुंग लागला. एक महत्त्वपूर्ण घटना या लाजिरवाण्या पराभवाला कारणीभूत ठरली आहे.
भारतीय क्रिकेटपटूंच्या सरावात कलात्मकतेचा अभाव याप्रसंगी प्रकर्षाने दिसून आला. न्यूझीलंडच्या खेळाडूंना कशाप्रकारे सामोरे जायचे याबाबतचा सरावच टीम इंडियाकडून करण्यात आला नाही.
मान्य आहे की खेळ म्हणाला की जय पराजय होतो. कधी यश हाती लागते, तर कधी अपयश, पण हरताना जर समोरच्या संघाने खूप वरचढ खेळ केला असेल किंवा जोरदार लढत दिल्यानंतर निसटता पराभव झाला असेल, तर मग मनाला वाईट वाटत नाही. तुल्यबळ लढतीनंतर चांगला खेळ बघितल्याची भावना लक्षात राहते, पराभवाचा क्षण नाही.
पण गेल्या दोन कसोटी सामन्यांत भारतीय क्रिकेट संघाचा झालेल्या पराभवात ना समोरच्या संघाने फार वरचढ खेळ केलाय ना तुल्यबळ लढत बघायला मिळाली आहे. म्हणून हे दोन्ही पराभव जिव्हारी लागत नाहीयेत, तर लाजिरवाणे वाटत आहेत. ही माझी मते नाहीत तर क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या जनसामान्य प्रेक्षकांची आहेत.