Coach Abhishek Nayar press conference: विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना पुन्हा फॉर्मात येण्यासाठी वेळ द्यायला हवा आणि संयमही राखायला हवा. त्यांना लय सापडली की पुन्हा एकदा यशाचा आलेख मोठ्या प्रमाणात उंचावला जाईल, असा विश्वास भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी व्यक्त केला.
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ०-२ असे पिछाडीवर पडलेल्या भारताने मुंबईत होणाऱ्या तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यासाठी आजपासून जोरदार सरावाने सुरुवात केली. बंगळूरू आणि पुणे कसोटीत झालेल्या चुका सुधारण्यासाठी हा सराव महत्त्वाचा होता.
सराव सुरू होण्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत नायर यांनी विविध विषयांवर मतप्रदर्शन केले. यात अर्थात प्रमुख मुद्दा होता तो रोहित आणि विराट यांच्या अपयशाचा. बंगळूरू कसोटीत पहिल्या डावात ४६ आणि पुणे कसोटीत पहिल्या डावात १५५ धावांत भारतीय संघ गारद झाला, त्यात रोहित-विराटचे अपयश ठळकपणे दिसून आले.
रोहित आणि विराटबाबत विचारले असता नायरने अर्थातच त्यांची पाठराखण केली. या दोघांना त्यांच्या पद्धतीने पुन्हा फॉर्मात येण्यासाठी वेळही द्यायला हवा, असे सांगितले. 'सर्वच जण कठोर मेहनत घेत आहेत. त्यांचा दृष्टिकोन आणि हेतूही प्रामाणिक आहे, म्हणूनच थोडा वेळ देणे महत्त्वाचे आहे,' असेही मत नायर यांनी व्यक्त केले.
'भारतीय संघही या मालिकेत अपेक्षित कामगिरी करू शकलेला नाही, त्यामुळे आलेख निश्चितच खाली आला आहे; परंतु मुंबईतील या कसोटीतून आम्हाला नवी सुरुवात करायची आहे आणि येथूनच पुढे उंचावलेला आलेख दीर्घकाळ मोठा करायचा आहे,' अशी अपेक्षा नायर यांनी व्यक्त केली.
नायर हे स्वतः मुंबईचे खेळाडू होते. रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल आणि सर्फराझ खान हे मुंबईकर खेळाडू आहेत. त्यामुळे शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या या कसोटीसाठी मुंबईतील हवामान, खेळपट्टीचे स्वरूप याबाबतचे इनपुट्स संघासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.
मात्र, खेळपट्टीबाबत विचारले असता नायर म्हणाले, 'आम्ही खेळपट्टी तयार करत नाही. तसेच, आपल्यासाठी ठरावीक स्वरूपाची खेळपट्टी तयार करा, असाही आग्रह धरत नाही. जशी खेळपट्टी असेल त्यावर खेळण्याचा प्रयत्न करतो. नायर यांनी साचेबद्ध उत्तर दिले असले तरी वानखेडेची खेळपट्टी कशीही असली तरी ती त्यांच्या चांगली परिचयाची असणार हे निश्चित आहे.
पहिल्या दोन कसोटींत आम्ही कमी पडलो हे निश्चित आहे; परंतु चांगला आणि परिस्थितीनुसार खेळ केल्याचे श्रेय न्यूझीलंडला द्यायला हवे. भारतीय फलंदाज आता फिरकी खेळू शकत नाही, असे वाटते का, असा प्रश्न विचारल्यावर नायर म्हणाले, हे विधान तीव्र स्वरूपाचे वाटते. असा विचार करण्यापेक्षा आपण न्यूझीलंड गोलंदाजांना श्रेय द्यायला हवे. त्यांनी परिस्थितीचा चांगला फायदा घेतला आणि सातत्यही राखले.
रोहित शर्मा हा कट्टर मुंबईकर खेळाडू असला तरी तो ११ वर्षांनंतर वानखेडेवर कसोटी सामना खेळणार आहे. या अगोदरचा त्याचा मुंबईतील कसोटी सामना वेस्ट इंडीजविरुद्धचा होता. तो सामना सचिन तेंडुलकरचा अखेरचा कसोटी सामना होता आणि त्यात त्याने २०० धावा केल्या होत्या.
संघ असो वा वैयक्तिक खेळाडू जेव्हा वेगळ्या पद्धतीने किंवा विचारशक्तीने खेळण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतःला आव्हानात्मक परिस्थितीत टाकतात तेव्हा निकाल वेगळा लागू शकतो; परंतु संयम राखला तर त्यानंतर उंचावला जाणारा आलेख दीर्घकाळ टिकू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.