Sanjay Manjrekar Reacts on Virat Kohli: भारताचा माजी फलंदाज संजय मांजरेकरने सोशल मीडियावर पोस्ट करत विराट कोहलीची स्तुती केली. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात आज शुभमन गिल अनुपस्थित होता. शुभमनच्या अनुपस्थितीमुळे चौथ्या क्रमांकावर खेळणारा कोहली आज तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. दुर्दैवाने कोहली शून्यावर बाद झाला. परंतु त्याच्या लवकर फलंदाजीसाठी येण्याच्या निर्णयाचे संजय मांजरेकरने कौतुक केले. यावेळी त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर व माजी कर्णधार सौरव गांगुलीशी विराटची तुलना केली व त्याची स्तुती केली.
सोशल मीडियावर पोस्ट करत मांजरेकर म्हणाला, "विराट कोहलीला सलाम! संघाला गरज असाताना विराट लवकर फलंदाजीसाठी आला. गांगुली, तेंडुलकर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सलामीसाठी जाण्यास खूप उत्सुक असायचे, पण ते कसोटीत वरच्या क्रमांकावर खेळण्यास कधी गेले नाहीत. त्यामुळे विराट तु खरा चॅम्पियन आहेस."
भारताने आज न्यूझीलंडविरूद्ध पहिल्या सामन्यात लज्जास्पद कामगिरी केली. न्यूझीलंडविरूद्ध पहिल्या डावात भारताने केवळ ४६ धावा केल्या. भारताचे तब्बल ५ फलंदाज शून्यावर मघारी परतले. ज्यामध्ये विराट कोहली, सर्फराज खान, केएल राहूल, रविंद्र जडेजा, व आर अश्विन या खेळाडूंचा समावेश होता. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात १८८८ नंतर प्रथमच कसोटी क्रिकेटमध्ये आघाडीच्या ८ फलंदाजांपैकी ५ जणं शून्यावर बाद झाले.यापूर्वी १८८८ मध्ये मँचेस्टर कसोटीत इंग्लंडने ऑस्ट्रेलियाची अशी अवस्था केली होती.
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीला भारताचे ५ फलंदाज बाद करण्यात यश आले. विलियम ओ'रौर्कने ४ विकेट्स घेतले तर टीम साऊदीला १ विकेट घेण्यात यश आले.