India vs Sri Lanka 2nd ODI Match Result: रविवारी (४ ऑगस्ट) श्रीलंका विरुद्ध भारत संघात वनडे मालिकेतील दुसरा सामना झाला. कोलंबोला झालेला हा सामना श्रीलंकेने ३२ धावांनी जिंकला. यासह तीन सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेने १-० अशी आघाडी घेतली आहे.
या सामन्यात श्रीलंकेने भारतासमोर २४१ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ ४२.२ षटकात २०८ धावांवर सर्वबाद झाला. श्रीलंकेकडून जेफ्री वाँडरसेने ६ विकेट्स घेतल्या.
या सामन्यात श्रीलंकेने दिलेल्या २४१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी दमदार सुरुवात केली होती. रोहितने आक्रमक खेळताना अर्धशतकही पूर्ण केले. त्यांनी अर्धशतकी भागीदारीही केली.
परंतु, त्यांची भागीदारी ९७ धावांची झालेली असतानाच रोहितला जेफ्री वाँडरसेने १४ व्या षटकात बाद केले. रोहितने ४४ चेंडूत ६४ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ५ चौकार आणि ४ षटकार मारले.
त्यानंतर १८ व्या षटकात वाँडरसेने शुभमन गिललाही ३५ धावांवर कामिंदू मेंडिसच्या हातून झेलबाद करत माघारी धाडलं. त्याच षटकात वाँडरसेने शिवम दुबेलाही पायचीत पकडले. त्याला भोपळाही फोडता आला नाही. तरी एका बाजूला विराट कोहली असल्याने भारत फार चिंतेत नव्हता.
मात्र वाँडरसनेने विराटलाही २० व्या षटकात १४ धावांवर पायचीत केले. त्यानेच २२ व्या षटकातही श्रेयस अय्यरलाही ७ धावांवर पायचीत केले. इतक्यावरच वाँडरसे थांबला नाही, त्यानं २४ व्या षटकात केएल राहुलला भोपळाही न फोडू देता त्रिफळाचीत केलं. त्यामुळे एकावेळी भारताची अवस्था ६ बाद १४७ अशी झाली होती.
परंतु, नंतर अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदरने डाव सावरला. त्यांची भागीदारी रंगत असल्याने भारताच्या आशा कायम होत्या. मात्र ३४ व्या षटकात श्रीलंकेचा कर्णधार चरिथ असलंकाने अक्षर पटेलला आपल्याच गोलंदाजीवर झेल घेत ४४ धावांवर बाद केले. त्यानेच ३६ व्या षटकात १५ धावांवर वॉशिंग्टन सुंदरलाही माघारी धाडले.
यानंतर कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराजने कसंबसं २०० च्या वर भारताला पोहचवलं. परंतु, सिराजलाही असलंकाने ४ धावांवर पायचीत करत भारताच्या आशा संपवल्या. ४३ व्या षटकात अर्शदीप सिंग धावबाद झाला आणि भारताचा डावही संपला.
या सामन्यात श्रीलंकेकडून वाँडरसेव्यतिरिक्त कर्णधार असलंकाने ३ विकेट्स घेतल्या.
तत्पुर्वी श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर पाथम निसंका मोहम्मद सिराजच्या चेंडूवर बाद झाला.
परंतु, त्यानंतर श्रीलंकेचा डाव अविष्का फर्नांडो (४०) आणि कुशल मेंडिस (३०) यांनी ७४ धावांची भागीदारी करत सांभाळला. पण मधल्या षटकांमध्ये भारताच्या फिरकीपटूंनी वर्चस्व राखत श्रीलंकेची अवस्था ६ बाद १३६ अशी केली होती.
मात्र, श्रीलंकेच्या खालच्या फळीने दम दाखवला. दुनिथ वेल्लालागे (३९), कामिंदू मेंडिस (४०) आणि अकिला धनंजया (१५) यांनी छोटेखानी पण महत्त्वपूर्ण खेळी करत श्रीलंकेला ५० षटकात ९ बाद २४० धावांपर्यंत पोहचवले.
भारताकडून गोलंदाजी करताना भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने ३ विकेट्स घेतले, तर कुलदीप यादवने २ विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
आता भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा सामना ७ ऑगस्ट रोजी खेळवला जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.