India vs Sri Lanka, 3rd ODI Match: भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्याचा शेवट पराभवाने झाला. वनडे मालिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात श्रीलंकेने भारताला ११० धावांनी पराभवाचा धक्का दिला. यासह या मालिकेत २-० अशा फरकाने विजय मिळवला. भारताविरुद्ध श्रीलंकेने १९९७ नंतर वनडे मालिकेत विजय मिळवला आहे.
या सामन्यात श्रीलंकेने भारतासमोर २४९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा डाव २६.१ षटकात १३८ धावांतच संपुष्टात आला. श्रीलंकेकडून दुनिथ वेल्लालागेने ५ विकेट्स घेतल्या.
दरम्यान, भारताने या वनडे मालिकेपूर्वी झालेल्या टी२० मालिकेत श्रीलंकेला ३-० अशा फरकाने पराभूत केले होते.
बुधवारी झालेल्या तिसऱ्या वनडेत श्रीलंकेने दिलेल्या २४९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी सुरुवात चांगली केली होती. रोहितने नेहमीप्रमाणे आक्रमक सुरुवात केली होती. मात्र गिल पुन्हा एकदा मोठ्या धावा करण्यात अपयशी ठरला. त्याला पाचव्याच षटकात ६ धावांवर असिथा फर्नांडोने त्रिफळाचीत केले.
त्यानंतरही रोहित आपल्या लयीत खेळत होता. परंतु, त्यालाही ८ व्या षटकात दुनिथ वेल्लालागेने यष्टीरक्षक कुशल मेंडिसच्या हातून ३५ धावांवर झेलबाद केले. त्यानंतरही भारताची मधली फळी झटपट बाद झाली. १० व्या षटकात महिश तिक्षणाच्या चेंडूवर ऋषभ पंत ६ धावांवर यष्टीचीत झाला. तर ११ व्या षटकात वेल्लालागेने विराटला २० धावांवर यष्टीचीत केले.
इतकंच नाही तर वेल्लालागेने १३ व्या षटकात अक्षर पटेलला २ धावांवर त्रिफळाचीत केलं, तर श्रेयस अय्यरला ८ धावांवर पायचीत पकडलं. त्यामुळे भारताची अवस्था ६ बाद ८२ धावा अशी झालेली.
परंतु नंतर रियान पराग आणि शिवम दुबेने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा अडथळा जेफ्री वाँडरसेने दूर केला. रियानला १५ धावांवर त्रिफळाचीत केलं, तर दुबेला ९ धावांवर पायचीत केलं. यानंतरही कुलदीप यादवने वॉशिंग्टन सुंदरला साथ दिली होती.
परंतु, तोपर्यंत उशीर झाला होता. आक्रमक खेळत भारताचा डाव पुढे नेणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरला २६ व्या षटकात महिश तिक्षणाने ३० धावांवर बाद केले. यानंतर अखेरीस ३० चेंडूत ६ धावा करणाऱ्या कुलदीपला वेल्लालागेने पायचीत करत ५ विकेट्सही पूर्ण केल्या आणि भारताचा डावही संपवला.
श्रीलंकेकडून वेल्लालागेव्यतिरिक्त महिश तिक्षणा आणि जेफ्री वाँडरसे यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. असिथा फर्नांडोने १ विकेट घेतली.
तत्पुर्वी श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला होता. श्रीलंकेकडून पाथम निसंका आणि अविष्का फर्नांडो या सलामीवीरांनी ८९ धावांची भागीदारीही केली. पण निसंकाला अक्षर पटेलने ४५ धावांवर बाद केले.
त्यानंतरही कुशल मेंडिसने फर्नांडोला चांगली साथ दिली. या दोघांनीही ८२ धावांची भागीदारी केली. पण फर्नांडोला ९६ धावांवर रियान परागने पायचीत केले. त्याने १०२ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांसह ही खेळी केली. त्यानंतरही एका बाजूने कुशल मेंडिस झुंज देत देत होता.
मात्र अन्य फलंदाजांनी त्याला फारशी साथ दिली नाही. त्याने ८२ चेंडूत ५९ धावांची खेळी केली. त्याचबरोबर कामिंडू मेंडिसने २३ धावांची नाबाद खेळी केली.
भारताकडून गोलंदाजी करताना रियान परागने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद सिराज, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.