Australia A vs India A: भारतीय अ संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून प्रथम श्रेणी सामना खेळत आहे. या सामन्यात तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघासमोर चौथ्या डावात २२५ धावांचं लक्ष्य ठेवण्यात यश मिळवलं आहे.
या सामन्यात भारताला पहिल्या डावात पिछाडी स्वीकारावी लागली होती. पण असं असतानाही भारताने साई सुदर्शन आणि देवदत्त पडिक्कलने केलेल्या शानदार फलंदाजीमुळे दुसऱ्या डावात चांगले पुनरागमन केले आणि ऑस्ट्रेलियासमोर आव्हानात्मक लक्ष्यही ठेवले.
या सामन्यात दुसऱ्या दिवस अखेर सुदर्शन आणि पडिक्कल दोघेही नाबाद होते. तिसऱ्या दिवसाची सुरुवात झाली तेव्हा लगेचच सुदर्शनने शतक पूर्ण केले. परंतु त्याला लगेचच टॉड मर्फीने बाद केले. त्याने २०० चेंडूत ९ चौकारांसह १०३ धावांची खेळी केली. त्यानंतर मर्फीने पडिक्कलला ८८ धावांवर पायचीत केले.
साई सुदर्शन आणि पडिक्कल यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी १९६ धावांची महत्त्वाची भागीदारी केली. ते दोघे बाद झाल्यानंतर मात्र भारताची पडझड झाली.