India vs New Zealand Test: रविवारी भारतीय क्रिकेट संघासाठी अत्यंत खराब दिवस ठरला. भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत व्हाईटवॉशच्या नामुष्कीला सामोरे जावे लागले आहे.
भारतीय संघ मायदेशात पहिल्यांदाच कसोटी मालिकेत ३-० अशा फरकाने पराभूत झाला. दरम्यान, यामुळे भारतीय संघाचे दुहेरी नुकसान झाले आहे. भारताला व्हाईटवॉश तर स्वीकारावा लागलाच, पण त्याबरोबरच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२३-२५ स्पर्धेच्या पाँइंट्स टेबलमधील पहिले स्थानही गमवावे लागले.
भारताला रविवारी न्यूझीलंडविरुद्ध मुंबईत झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात २५ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. याआधीचे दोन्ही सामनेही न्यूझीलंडने बंगळुरू आणि पुणे येथे जिंकले होते.
ही मालिका सध्या सुरु असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२३-२५ स्पर्धेचाही (WTC 2023-25) भाग असल्याने मालिकेच्या निकालाचा परिणाम पाँइंट्स टेबलवरही झाला.
भारताला मुंबईत पराभूत व्हावं लागल्याने आता पाँइंट्स टेबलमध्ये भारतीय संघ ५८.३३ विजयी टक्केवारीसह दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. यामुळे ऑस्ट्रेलिया आता पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.