India vs New Zealand: भारतात कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी चर्चा कोण फलंदाज किती धावा करेल किंवा कोणता फलंदाज कोणत्या मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर उभा आहे याची व्हायची, पण गोष्टी झपाट्याने बदलल्या आहेत.
भारत विरुद्ध न्यूझीलंड तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेस दोन दिवसांचा अवधी बाकी असताना चर्चा फलंदाजांची नव्हे, तर हवामान, खेळपट्टी आणि गोलंदाजांची होत आहे.
दोनही संघांचा सराव ढगांनी निर्माण केलेल्या सावलीत झाला. सोमवारी सकाळी शहरात थोडा पाऊस पडला. सामन्यादरम्यानही थोडा थोडा पाऊस अधून-मधून पडायची शक्यता आहे.
चिन्नास्वामी मैदानावरची खेळपट्टी गवत काढलेली दिसत असली तरी थोडे गवताचे आच्छादन अजून तरी दिसत होते. ढगांच्या गर्दीमुळे मैदानावरील खेळपट्टीला ऊन लागत नसल्याने त्याचा परिणाम काय होणार याची उत्सुकता खेळाडूंना खेळपट्टी तपासताना वाटत असणार.
सोमवारी सकाळी पहिल्या सत्रात न्यूझीलंड संघाने सराव केला, तर दुपारी एक वाजता भारतीय संघ सरावाला आला. भारतीय संघाने सलग १८ कसोटी मालिका मायदेशात जिंकून दरार निर्माण केलेला आहे. आम्हाला चांगला खेळ करायचे खुणावत आहे.
न्यूझीलंड संघातील बऱ्याच खेळाडूंना भारतात खेळायचा भरपूर अनुभव आहे. फरक इतकाच आहे की त्यातील बराचसा अनुभव हा मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा आहे. कसोटी सामना म्हणजे वेगळे चित्र होते. चिन्नास्वामी मैदानाची खेळपट्टी एकदम आखाडा प्रकारातील वाटत नाहीये. त्यामुळे सामन्याला मजा येईल, असे मत न्यूझीलंडचा अष्टपैलू राचिन रवींद्र याने व्यक्त केले.
भारतीय संघातील सर्वच्या सर्व खेळाडूंनी मैदानावर हजेरी लावून तीन तास कसून सराव केला. विराट कोहलीने नेटमधील सरावात चांगली एक दीड तास फलंदाजीची मेहनत केली. सराव झाला की एक एक खेळाडू हळूच खेळपट्टीचा अंदाज लावून जात होता.
भारतीय संघातर्फे बोलायला मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आला. भारतात फलंदाजांच्या आकड्यांची त्यांच्या पराक्रमांची चर्चा करायला आवडते. मला तर वाटते की फलंदाजांनी कितीही धावा केल्या तरी कसोटी सामन्याला अपेक्षित गती मिळत नाही.
जर गोलंदाजांनी २० बळी योग्य वेळेत काढले, तर मात्र सामन्याला झपाट्याने गती मिळते. गेल्या काही वर्षात गोलंदाजांचा बोलबाला वाढला आहे ज्याचे मला खूप कौतुक आहे, असे गौतम गंभीर म्हणाला.
दोन्ही संघांकडे दर्जेदार वेगवान गोलंदाज आणि करामती फिरकी गोलंदाज असल्याने मालिकेत रंगत येईल. भारतीय संघ स्वत:च्या मर्यादा वाढवायच्या प्रयत्नात आहे. संघातील सर्व खेळाडूंच्यात गुणवत्ता असल्याने कोणाही खेळाडूला निवडले तरी तो सामना जिंकून द्यायला योग्य कामगिरी करायची मानसिक आणि शारीरिक तयारी बाळगून आहे, असे गंभीरने सांगितले.
विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या सामन्यात मी त्याच्या साथीला खेळत होतो. मी इतकेच खात्रीने सांगू शकतो की त्या सामन्यात देशासाठी खेळताना त्याचा जो उत्साह होता, तोच अजून जसाच्या तसा आहे. तेव्हा लवकरच तो लय पकडेल याची मला खात्री आहे.
भारतीय संघ न्यूझीलंड समोरच्या मालिकेवरच आत्ताच्या घडीला संपूर्ण लक्ष देणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्याचा विचार आम्ही तीन कसोटीत न्यूझीलंडसमोर खेळताना अजिबात करणार नाही, गौतम गंभीरने पटापट मुद्दे मांडणी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.