India vs New Zealand Pune Test: बंगळूर कसोटी चालू असतानाच पुण्यात कशाप्रकारची खेळपट्टी असायला पाहिजे, याचा विचार पक्का केला गेला होता. बीसीसीआयने नेमलेले आणि स्थानिक क्युरेटर यांनी गेले आठ दिवस प्रयत्न करून वेगवान गोलंदाजांना नव्हे तर फिरकीला साथ देणारी खेळपट्टी दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी तयार केल्याचे दिसत आहे.
पुणे कसोटी सामना जिंकून मालिकेत पहिली १-१ बरोबरी करायचा उद्देश भारतीय संघाला साध्य करायचा आहे. त्यासाठी भारतीय संघात कदाचित तीन बदल केले जातील, असाही अंदाज लावला जातोय.
पहिल्या कसोटी सामन्यातील अनपेक्षित पराभवाच्या धक्क्याने पुणे कसोटी सामन्याचे महत्त्व वाढले आहे आणि प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. एकंदरीत चांगल्या कसोटी सामन्यासाठी वातावरण तापले आहे आणि गुरुवारी सकाळचे साडेनऊ कधी वाजतात, अशी हुरहुर पुण्यातील क्रिकेटरसिकांना लागली आहे.