London Spirit women’s Deepti Sharma: भारताची स्टार अष्टपैलू दीप्ती शर्मा हिने काल दी हंड्रेड लीगची फायनल गाजवली... संघाला विजयासाठी ३ चेंडूंत ४ धावांची गरज असताना दीप्तीने खणखणीत षटकार खेचला आणि लंडन स्पिरिट संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला. लॉर्ड्स मैदानावर झालेल्या फायनलमध्ये टॅमी बियूमोंटच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या वेल्श फायर संघाने १०० चेंडूंत ८ बाद ११५ धावा केल्या. लंडनच्या संघासाठी ११६ धावांचे लक्ष्य काहीच नव्हते, परंतु त्यांना अखेरपर्यंत टक्कर द्यावी लागली. दीप्तीच्या षटकाराने त्यांनी ९८ चेंडूंत सामना जिंकून पहिले दी हंड्रेड जेतेपद जिंकले.
यष्टीरक्षक-फलंदाज जॉर्जिया रेडमायने हिने सलामलीा येताना लंडन स्पिरिटसाठी सर्वाधिक ३४ धावा केल्या. कर्णधार हिदर नाइट २४ धावा आणि डॅनिएल गिब्सन ९ चेंडूंत २२ धावांचे योगदान देऊन माघारी परतली. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या दीप्तीने १६ चेंडूंत १६ धावा करून विजय मिळवून दिला.
वेल्श फायरसाठी दक्षिण आफ्रिकेची गोलंदाज शाबनिम इस्मैलने २० चेंडूंत २४ धावा देताना ३ विकेट्स घेतल्या.
त्याआधी वेल्शकडून ऑस्ट्रेलियन फिरकीपटू जेस जॉनासेनने ४१ चेंडूंत ५४ धावा केल्या. तिने ८ चौकार खेचले. तिच्याशिवाय वेस्ट इंडिजची ऑल राऊंडर हिली मॅथ्यूने २४ आणि बियूमाँटने २१ धावा केल्या. इव्हा ग्रे व सराह ग्लेन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. दीप्तीने २३ धावा देताना १ विकेट घेतली.
लंडन स्पिरिटची कर्णधार नाइटने दीप्तीचे कौतुक केले. तिने म्हटले, खरं सांगायचं तर असा क्षण पाहणे चांगले नाही. ही अटीतटीची मॅच झाली, परंतु दीप्ती अनुभवी खेळाडू आहे आणि अशा परिस्थिती शांत राहून कसा खेळ करायचा हे तिला चांगले माहित आहे.''