County Championship: भारतात सध्या इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) 17 वा हंगाम सुरू आहे. पण याचदरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौलने इंग्लंडमधील देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यास सज्ज आहे.
पंजाबकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या सिद्धार्थने काउंटी चॅम्पियनशीप स्पर्धेतील उर्वरित सामन्यांसाठी नॉर्थहॅम्प्टनशायर क्लबबरोबर करार केला आहे.
33 वर्षीय सिद्धार्थ पंजाब संघातील प्रमुख खेळाडूंपैकी एक असून या संघाकडून त्याने सातत्यपूर्ण कामगिरीही केली आहे. त्यामुळे त्याचा अनुभव नॉर्थहॅम्प्टनशायर संघासाठीही महत्त्वाचा ठरू शकतो.
त्याने नॉर्थहॅम्प्टनशायरबरोबर करार केल्याबद्दल संघाचे प्रशिक्षक जॉन सॅडलर यांनीही आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की 'सिद्धार्थकडे अनुभव आहे, त्याने भरपूर प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले आहे.'
'तो जेव्हा संघाशी जोडला जाईल, तेव्हा तो मोठा प्रभाव पाडण्यासाठीही उत्सुक आहे.' त्याचबरोबर त्यांनी आशा व्यक्त केली की तो भारतातील देशांतर्गत स्पर्धेत नुकताच जशा चांगल्या फॉर्ममध्ये खेळला, तसाच फॉर्म तो इंग्लंडमध्येही राखेल.
सध्या नॉर्थहॅम्प्टनशायर संघाचे सध्या 54 गुण असून ते डिव्हिजन टूमध्ये पाचव्या क्रमांकावर आहेत. त्यांचे अद्याप तीन सामने बाकी असून पुढील सामना शुक्रवारपासून (१० मे) ग्लुसेस्टरशायरविरुद्ध सुरु होणार आहे. या सामन्यासाठीही सिद्धार्थ उपलब्ध असणार आहे.
या संघाकडून खेळण्याबद्दल सिद्धार्थ म्हणाला, 'नॉर्थहॅम्प्टनशायर संघाचे प्रतिनिधित्व करण्याबद्दल मी खूश आहे. मी संघाला जिंकून देण्यासाठी आणि संघाचे प्रमोशन डिव्हिजन वनमध्ये व्हावे यासाठी योगदान देण्यास उत्सुक आहे.'
'मी माझ्या सकारात्मक मानसिकतेसह आणि अनुभवासह संघसहकाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सामना जिंकून देण्यासाठी मदत करेल, हा विश्वास मला आहे.'
सिद्धार्थने त्याच्या कारकिर्दीत 3 वनडे आणि 3 टी20 सामने खेळले आहेत. यात त्याने एकूण 4 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याला 83 प्रथम श्रेणी सामने खेळण्याचा अनुभव असून त्याने या सामन्यांमध्ये 284 विकेट्स घेतल्या आहेत.
त्याने 111 लिस्ट ए सामनेही खेळले आहेत, ज्यात त्याने 199 विकेट्स घेतल्या आहेत. 145 टी20 सामन्यांत त्याने 182 विकेट्स घेतल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.