IPL 2025 Retention: आयपीएलच्या पुढील मोसमासाठी नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस लिलाव होणार आहे, पण त्याआधी ३१ ऑक्टोबरपर्यंत सर्व फ्रँचायझींना (संघ मालक) आपल्या संघातील कायम खेळाडूंची यादी जाहीर करावयाची आहे.
याप्रसंगी फ्रँचायझींसमोर कोणत्या पाच ते सहा खेळाडूंना कायम ठेवायचे, असा यक्ष प्रश्न पडला असेल. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरकडून विराट कोहलीची पुन्हा कर्णधारपदी निवड होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
तसेच लिलावामध्ये जास्तीत जास्त रक्कम शिल्लक रहावी व जुन्या संघातील अधिकाधिक खेळाडू संघात कायम रहावेत यासाठी गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार शुभमन गिल त्याला मिळणाऱ्या रकमेत कपात करू शकतो, अशाप्रकारचे वृत्तही समोर आले आहे.
आयपीएलसाठी नव्या नियमाचा अवलंब करण्यात येणार आहे. त्यानुसार सहभागी संघाच्या फ्रँचायझींना पाच खेळाडू कायम ठेवण्याचा अधिकार असणार आहे, तसेच राईट टू मॅच या कार्डद्वारे त्यांना सहावा खेळाडूही संघात कायम ठेवता येणार आहे. जे खेळाडू अद्याप देशासाठी खेळलेले नाहीत, अशा खेळाडूंना संघात कायम ठेवल्यास त्यांना चार कोटी मोजावे लागणार आहेत.