IPL Retention 2025: इंडियन प्रीमियर लीगमधील फ्रँचायझींनी गुरुवारी आगामी १८ व्या हंगामासाठी संघात रिटेन केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. रिटेन खेळाडूंची नावं जाहीर झाल्यानंतर अनेक धक्कादायक निर्णयही समोर आले आहेत.
बऱ्याच स्टार खेळाडूंना फ्रँचायझींनी बाहेरचा रस्ता दाखवला आहे. विशेष म्हणजे यामध्ये काही संघांचे २०२४ वर्षातील हंगामाचे कर्णधारही आहेत. यातीलच एक मोठं नाव म्हणजे श्रेयस अय्यर. श्रेयस अय्यरने आपल्या नेतृत्वाने गेल्या काही हंगामांमध्ये प्रभावित केले होते.
विशेष म्हणजे कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल २०२४ स्पर्धेचे विजेतेपद श्रेयस अय्यरच्याच नेतृत्वात जिंकले होते. तो कोलकाताला आयपीएलचे विजेतेपद जिंकून देणारा गौतम गंभीरनंतरचा दुसराच कर्णधार ठरला होता.
परंतु, असे असतानाही आता कोलकाता नाईट रायडर्सने श्रेयस अय्यर याला आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी कायम केले नाही. त्यांनी गुरुवारी त्याला करारमुक्त केले आहे.
कोलकाताने सुनील नरेन, आंद्रे रसेल, रिंकु सिंग, रमणदीप सिंग, हर्षित राणा आणि वरूण चक्रवर्ती या खेळाडूंना संघात कायम केले आहे. यातील रमणदीप आणि हर्षित हे दोघे अनकॅप खेळाडू (आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेले) आहे, तर बाकी चारही खेळाडू कॅप खेळाडू (आंतरराष्ट्रीय खेळाडू) आहेत.