Ishan Kishan on Hardik Pandya: भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनसाठी हे संपूर्ण वर्ष चढउतारांचं राहिलं आहे. भारताच्या राष्ट्रीय संघातून जागा गमावण्यापासून पुन्हा पुनरागमनासाठी भारतीय अ संघात स्थान मिळवून दावेदारी ठोकण्यापर्यंत त्याच्यासाठी अनेक गोष्टी गेल्या वर्षभरात घडल्यात. सध्या इशान ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या ऋतुराज गायकवाड कर्णधार असलेल्या भारत अ संघाचा भाग आहे.
इशानने २०२३ वर्षाच्या अखेरीस दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून अचानक माघार घेतली होती. त्यानंतर त्याने देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास नकार दिल्याने त्याला बीसीसीआयच्या वार्षिक करारही गमावावा लागल्याचे म्हटले गेले. त्याशिवाय त्याला त्यानंतर अद्याप एकदाही भारताच्या संघात संधी मिळालेली नाही.
पण त्याने नंतर फेब्रुवारी-मार्च दरम्यान डीवाय पाटील टी२० स्पर्धा खेळत स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते. त्याने आयपीएल २०२४ स्पर्धाही खेळली. तसेच त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्येही नंतर पुनरागमन करताना दुलीप ट्रॉफी, इराणी कप, रणजी ट्रॉफीचे सामने खेळले असून आता तो भारत अ संघाकडून खेळताना दिसणार आहे.