Ishan Kishan: टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेचे विजेतेपद नुकतेच भारतीय संघाने जिंकले. आता यानंतर लगेचच भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. दरम्यान, झिम्बाब्वे दौऱ्यासाठी अनेक युवा खेळाडूंचा भारतीय संघात समावेश आहे. यात टी२० वर्ल्ड कपमध्ये सामील असलेल्या अनेक खेळाडूंचा समावेश नाही.
या दौऱ्यात भारतीय संघाचे नेतृत्व वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत शुभमन गिल करणार आहे. तथापि, लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की झिम्बाब्वे दौऱ्यासाठी याआधी जो संघ जाहीर केली होती, त्यात टी२० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाचा भाग असलेल्या संजू सॅमसन, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल या खेळाडूंचाही समावेश होता.
मात्र, सध्या टी20 वर्ल्ड कप 2024 विजेत्या भारतीय संघ बार्बाडोसमध्येच अडकला आहे. लवकरच हा संघ भारतात येईल.
मात्र, भारतात येण्यासाठी उशीर झाला असल्याने सॅमसन, दुबे आणि जैस्वाल यांना झिम्बाब्वे विरूद्धच्या पहिल्या दोन टी२० सामन्यासाठी भारतीय संघातून काढण्यात आले असून त्यांचे बदली खेळाडू म्हणून साई सुदर्शन, जितेश शर्मा आणि हर्षित राणा यांना भारतीय संघात संधी देण्यात आली आहे.
दरम्यान, आता सॅमसन, दुबे आणि जैस्वाल आधी भारतात येतील आणि नंतर झिम्बाब्वे दौऱ्यातील शेवटच्या तीन टी20 सामन्यांसाठी रवाना होतील.
दरम्यान, झिम्बाब्वे दौऱ्यासाठी जाणाऱ्या भारतीय संघात अनेक युवा खेळाडूंना संधी दिली असतानाच इशान किशनकडे दुर्लक्ष केल्याच्या चर्चा होत आहे.
खरंतर चक्रीवादळामुळे बार्बाडोसमध्ये भारतीय संघ आडकल्यानंतर झिम्बाब्वे दौऱ्यासाठी जैस्वालच्या किंवा संजू सॅमसनच्या जागेवर इशान किशनची निवड होईल अशी चर्चा होती. मात्र त्यांच्याजागेवर साई सुदर्शन आणि जितेश शर्माला संधी दिल्याने पुन्हा एकदा इशानकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून इशान बीसीसीआयच्या निशाण्यावर असल्याचे दिसून येत आहे. त्याला फेब्रुवारी-मार्चमध्ये देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास बीसीसीआयने सांगितले होते.
मात्र इशानने कोणताही देशांतर्गत क्रिकेट सामना खेळला नाही. तो २०२३ च्या अखेरीपासून भारतीय संघातून दूर आहे. त्याने दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघार घेतल्यानंतर भारतीय संघात त्याचा समावेश करण्यात आलेला नाही.
यादरम्यान, त्याने देशांतर्गत क्रिकेट खेळणे अपेक्षित होते. मात्र, त्याने तसे न करता आयपीएलमध्ये तो सहभागी झाला. त्याचमुळे अनेक मिडिया रिपोर्ट्सनुसार शिस्तभंगाची कारवाई म्हणूनच त्याला बीसीसीआयने आपल्या वार्षिक करारात स्थान दिले नाही. आता त्याला भारतीय संघातही स्थान मिळवणे कठीण झाल्याचे दिसत आहे.
इशान किशनने त्याच्या कारकिर्दीत २ कसोटी खेळले असून ७८ धावा केल्या आहेत, तसेच २७ वनडेत त्याने ९३३ धावा केल्या आहेत, ज्यात एक द्विशतक आणि ७ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्याने ३२ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. यामधये त्याने ६ अर्धशतकांसह ७९६ धावा केल्या आहेत.
झिम्बाब्वे दौऱ्यातील पहिल्या दोन टी20 सामन्यासाठी असा आहे भारतीय संघ -
शुभमन गिल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकु सिंग, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे, साई सुदर्शन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हर्षित राणा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.