India vs New Zealand 1st Test: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यातील तिसरा दिवस (१८ ऑक्टोबर) रोमांचक ठरला. तिसऱ्या दिवशी दोन्ही संघांकडून तब्बल ४५३ धावा ठोकण्यात आल्या. तसेच सुरुवातीचा सकाळचा वेळ सोडला, तर गोलंदाजांना फारशी मदत मिळाली नाही.
याबाबतच भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवने आपली प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, या मैदानात धावांवर नियंत्रण ठेवणे कठीण आहे. त्याचबरोबर त्याने न्यूझीलंडचा अष्टपैलू रचिन रविंद्र आणि भारताचे फलंदाज विराट कोहली व सर्फराज खान यांचेही कौतुक केले.
कुलदीप म्हणाला, 'चिन्नास्वामी मैदान असे आहे जिथे मारलेला चेंडू सीमेकडे झपाट्याने जातो आणि हवेत मारलेले फटके प्रेक्षकात जाऊन पडतात. तसेच, इथली खेळपट्टी अशी आहे की चांगल्या चेंडूवरही मोठे फटके बसले. कदाचीत काल मैदान थोडं ओलं होतं, पण आज ते पूर्ण सुकलेले होते. हे छोटं मैदान आहे आणि त्यामुळे इथे सहज धावा होतात.तरीही आम्हाला तिसऱ्या दिवशी सकाळी चार फलंदाज बाद केल्यावर संधी होती.'