IND vs AUS Test Series: न्यूझीलंडविरूद्ध ३-० असा पराभव स्वीकारल्यानंतर भारतीय संघ ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. ही मालिका भारतासाठी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील शेवटची मालिका असेल. बासीसीआय सुत्रांच्या माहितीनुसार या मालिकेनंतर भारतीय नियामक मंडळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. मालिकेनंतर संघातील वरिष्ठ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला जावू शकतो.
भारतीय संघात रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन हे त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात खेळत आहेत. या चार ज्येष्ठ खेळाडूंपैकी किमान दोन खेळाडूंसाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका अंतिम ठरू शकते. त्यानंतर पुढील WTC स्पर्धेच्या सत्रात नव्या खेळाडूंना संघात स्थान देण्यात येण्याची शक्यता आहे.
कर्णधार रोहित शर्माच्या कर्णधार पदाचा कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. भारताच्या कसोटी भविष्याबद्दल प्रश्न विचारला असता रोहित म्हणाला, " आपण इतका पुढचा विचार करू शकत नाही. माझ्यासाठी पुढील मालिकेवर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे."
"मी ऑस्ट्रेलिया मालिकेपलीकडे पाहाणार नाही. ऑस्ट्रेलिया मालिका आमच्यासाठी आता खूप महत्त्वाची आहे. त्यानंतर काय होईल याचा विचार करण्यापेक्षा आम्ही मालिकेवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करू." रोहित पुढे म्हणाला.
बीसीआय सुत्राच्या मार्फत असे कळत आहे की, भारत जर ऑस्ट्रेलिया मालिकेनंतर कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचला नाही, तर वरिष्ठ खेळाडूंना कसोटी संघातून विश्रांती देण्यात येईल व संघात नव्या खेळाडूंना जागा देण्यात येईल. त्यामुळे रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन या वरिष्ठ खेळाडूंची संघातील जागा धोक्यात आहे.