KKR IPL Retention: मागील आठवड्यात कोलकाता नाईट रायडर्स ने संघात कायम राहणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर केली. ज्यामध्ये केकेआर (KKR) संघाने धक्कादायक निर्णय घेतल्याचे पाहायला मिळाले. फ्रॅंचायझीने गतवर्षीचा आयपीएल विजेता कर्णधार श्रेयस अय्यरला संघातून रिलीज केले. येवढेच नव्हे तर, आजवरच्या आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू मिचेल स्टार्कलाही (२४.७५ कोटी) केकेआरने संघात कायम ठेवले नाही.
आयपीएल २०२५ साठी केकेआरने रिंकू सिंग (१३ कोटी), वरुण चक्रवर्ती (१२ कोटी), सुनील नरेन (१२ कोटी), आंद्रे रसेल (१२ कोटी), हर्षित राणा (४ कोटी) आणि रमणदीप सिंग (४ कोटी) या पाच खेळाडूंना संघात कायम ठेवले.
आयपीएल २०२५ लिलावापूर्वी केकेआरमधून स्टार्कला रिलीज केल्यानंतर, स्टार्कने संवादाच्या अभावाबद्दल असमाधान व्यक्त केले. स्टार्क म्हणाला, "त्यांनी अद्याप माझ्याशी संवाद साधलेला नाही." स्टार्कने डेली टेलिग्राफला खुलासा केला.
"आयपीएल एक फ्रॅंचायझी क्रिकेट स्पर्धा आहे. मला वाटते हैदराबाद संघातील पॅट कमिन्स आणि ट्रेव्हिस हेड वगळता इतर सर्व ऑस्ट्रेलियन खेळाडू लिलावात उतरतील." असे म्हणत स्टार्कने विषट टाळण्याचा प्रयत्न केला.
स्टार्कने मागच्या हंगामातील अंतिम सामन्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आणि त्याने २ विकेट्स पटकावत अवघ्या १४ धावा दिल्या. मागील हंगामात त्याने एकूण १३ विकेट्स घेतल्या.