Mohammad Shami News: भारताचा ३४ वर्षीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या पुनरागमनाची प्रतिक्षा भारतीय संघासह चाहत्यांनाही आहे. शमीला आता स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर जाऊन वर्ष होत आलं आहे, मात्र अद्यापही त्याच्या पुनरागमनाची चिन्ह दिसून येत नाहीयेत.
शमी भारताकडून अखेरचे २०२३ वनडे वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात खेळला होता. त्यानंतर त्याच्या टाचेच्या दुखापतीने डोके वर काढले होते. त्यावर त्याने उपचार केले, मात्र त्याला फेब्रुवारी २०२४ मध्ये शस्त्रक्रिया करून घ्यावी लागली. त्यानंतर तो त्यातून सावरला आणि तंदुरुस्ती मिळवण्याचा प्रयत्न करत होता.
तो न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून पुनरागमन करेल, अशी अपेक्षा होती. मात्र या मालिकेतील पहिला सामना सुरू असतानाच त्याच्या गुडघ्याला सुज आली. त्यामुळे त्याचे पुनरागमन लांबले आहे.
शमी बराच काळापासून स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर असल्याने त्याने म्हटले होते की त्याला आधी देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळायचे आहे. मात्र, त्याच्या दुखापती त्याला क्रिकेटपासून दूर ठेवत आहेत.