MS Dhoni: चेन्नई सुपर किंग्स संघाचे आयपीएल 2024 मधील आव्हान संपले आहे. अशात आता चेन्नईचा माजी कर्णधार एमएस धोनी पुढचा हंगाम खेळणार की नाही, याबद्दल चर्चा सुरू आहे. याचदरम्यान आता धोनीच्या चेन्नई संघासोबत असलेल्या नात्याबद्दलच्या भावना समोर आल्या आहेत.
दुबई आय 103.8 ने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यात धोनी चेन्नई संघाबरोबरील नात्याबद्दल, नेतृत्त्वाबद्दल बोलत आहे. हा व्हिडिओ आयपीएल 2024 स्पर्धेची साखळी फेरी चालू असतानाचा आहे.
या व्हिडिओमध्ये दिसते की धोनीने सांगितले 'माझे चेन्नईबरोबरचे नाते भावनिक आहे. एखादा खेळाडू येतो दोन महिने खेळतो आणि घरी जातो, असं ते नातं नाहीये. भारतीय असल्याने भावनिक नातं ही माझी ताकद आहे.'
त्याचबरोबर नेतृत्वाबद्दल धोनी म्हणाला,'एक कर्णधार म्हणून तुम्हाला लोकांकडून आदर कमवावा लागतो. तुम्ही आदर मिळाला अशी आज्ञा किंवा मागणी करू शकत नाही. तुम्हाला तो आदर कमवावा लागतो.'
तो असंही म्हणाला, 'तुम्हाला चढ-उतारात नेतृत्व करताना समोर आदर्श घालून द्यावा लागतो. जेव्हा तुम्ही यशस्वी असता, तेव्हा आपण हे करू म्हणणे सोपे असते. पण जेव्हा कठीण वेळ असते, तेव्हा तुम्हाला जाऊन संभाषण करते गरजेचे असते. तुम्हाला या सर्व परिस्थितीत सारखंच स्थिर रहावं लागतं. यामुळेच तुम्ही आदर कमावू शकता.'
धोनीने असेही सांगितले की 2015 नंतर त्याने त्याच्या कुटुंबाला अधिक वेळ देण्याचे ठरवले होते. त्याने 2014 च्या अखेरीस कसोटीतून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर तो भारताकडून 2019 पर्यंत केवळ वनडे आणि टी20 क्रिकेट खेळला. त्याने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली.
धोनी म्हणला, 'मला वाटते जेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असता, विशेषत: बराच काळ तुम्ही भारतीय संघाचा भाग असता,तेव्हा तुम्हाला तुमच्या कुटुंबाची बऱ्याचदा आठवण होते. 2015 पर्यंत मी सर्व प्रकारात खेळत होतो आणि खूप कमी वेळा घरी असायचो. 2015 नंतर मी माझ्या आई-वडिलांबरोबर आणि कुटुंबाबरोबर अधिक वेळ घालवण्याचा निर्णय घेतला.'
याशिवाय धोनीने सांगितले की ट्वीटरपेक्षा तो इंस्टाग्रामला पसंती देतो कारण ट्वीटरवर काहीही लिहिले, तरी त्यावर भारतात वादविवाद होऊ शकतात.
दरम्यान, धोनी नुकताच आयपीएल 2024 खेळल्यानंतर रांचीला परतला आहे. त्यानंतर आता तो पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर दिसणार की नाही, याबद्दल अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी मतं व्यक्त केली आहेत. पण अद्याप त्याच्या भविष्यावर त्याने मात्र मौन बाळगले आहे.
धोनीने चेन्नई सुपर किंग्सला त्याच्या नेतृत्वात 5 वेळा आयपीएलचे आणि 2 वेळा चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद मिळवून दिले आहे. त्याने आयपीएलमध्ये 264 सामने खेळले असून 24 अर्धशतकांसह 5243 धावा केल्या आहेत. त्याने यष्टीरक्षण करताना 148 झेल आणि 42 यष्टीचीत केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.