Ranji Trophy : मुंबईचा क्रिकेट संघ ५७ धावांनी पुढे ; शाश्‍वत, विष्णू यांची शतके

मुंबईच्या संघाने घरच्या मैदानावर सुरू असलेल्या रणजी क्रिकेट करंडकातील बडोद्याविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत पहिल्या डावात ३६ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली.
Ranji Trophy
Ranji Trophysakal
Updated on

मुंबई : मुंबईच्या संघाने घरच्या मैदानावर सुरू असलेल्या रणजी क्रिकेट करंडकातील बडोद्याविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत पहिल्या डावात ३६ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली. शाश्‍वत रावतने १२४ धावांची आणि विष्णू सोलंकीने १३६ धावांची खेळी साकारल्यानंतरही बडोद्याला ३४८ धावांपर्यंत मजल मारता आली. मुंबईने तिसऱ्या दिवसअखेरीस १ बाद २१ धावा केल्या असून आता मुंबईचा संघ ५७ धावांनी पुढे आहे.

शाश्‍वत रावत व कर्णधार विष्णू सोलंकी या जोडीने १७४ धावांची भागीदारी केली. ही जोडी फलंदाजी करीत असताना बडोद्याचा संघ मुंबईच्या पहिल्या डावातील धावसंख्या सहज ओलांडणार, असे वाटत होते; पण तुषार देशपांडेच्या गोलंदाजीवर शाश्‍वत १२४ धावांवर बाद झाला. शाश्‍वतने आपल्या खेळीत १५ चौकार मारले.त्यानंतर विष्णू याने बडोद्याचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला; पण दुसऱ्या बाजूने इतर फलंदाजाची साथ लाभली नाही. विष्णू याने १४ चौकारांसह १३६ धावांची खेळी साकारली. तुषारच्याच गोलंदाजीवर तो बाद झाला. शम्स मुलानी याने चार फलंदाज बाद केले.

Ranji Trophy
Aus vs Nz : ऑस्ट्रेलियाचे टी-२० मालिकेत निर्भेळ यश

तमिळनाडू उपांत्य फेरीत

तमिळनाडूचा संघ रणजी करंडकाच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. तमिळनाडूने सौराष्ट्राचा एक डाव व ३३ धावांनी धुव्वा उडवला. सौराष्ट्राचा पहिला डाव १८३ धावांवर आटोपल्यानंतर तमिळनाडूने पहिल्या डावात ३३८ धावा फटकावल्या. सौराष्ट्राचा दुसरा डाव रविवारी १२२ धावांवरच गारद झाला. चेतेश्‍वर पुजाराने ४६ धावांची खेळी साकारली; पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. पहिल्या डावात पाच फलंदाजांना बाद करणाऱ्या साई किशोर याने दुसऱ्या डावातही चुणूक दाखवली. त्याने २७ धावा देत चार फलंदाज बाद केले.

आंध्र-मध्य प्रदेशमध्ये अटीतटीची झुंज

आंध्र-मध्य प्रदेश यांच्यामध्ये अटीतटीची उपांत्यपूर्व लढत सुरू आहे. मध्य प्रदेशचा पहिला डाव २३४ धावांवर आटोपल्यानंतर त्यांनी आंध्र प्रदेशला पहिल्या डावात १७२ धावांमध्ये गुंडाळले; मात्र मध्य प्रदेशला दुसऱ्या डावात १०७ धावाच करता आल्या. त्यामुळे आंध्रसमोर विजयासाठी १७० धावांचे आव्हानच उभे ठाकले; पण तिसऱ्या दिवसअखेरीस आंध्रने ४ बाद ९५ धावा केल्या असून आता त्यांना विजयासाठी आणखी ७५ धावांची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.