India vs New Zealand Test Series: न्यूझीलंड संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात न्यूझीलंडला १६ ऑक्टोबरपासून भारताविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२३-२५ स्पर्धेचाही भाग असल्याने दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे.
या मालिकेसाठी न्यूझीलंडनेही आता तगडा संघ जाहीर केला आहे. या मालिकेपासून टॉम लॅथम पूर्णवेळ कसोटी कर्णधार म्हणून न्यूझीलंड संघाची धूरा सांभाळणार आहे. या मालिकेपूर्वी टीम साऊदीने कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान, या मालिकेत बंगळुरूला होणाऱ्या पहिल्या सामन्यात दिग्गज केन विलियम्सन न खेळण्याची दाट शक्यता आहे. त्याला गेल्या महिन्यात श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यादरम्यान मांड्यांजवळ वेदना जाणवल्या होत्या.
त्यामुळे त्याच्या दुखापतीबाबत अधिक जोखीम न्यूझीलंड घेऊ इच्छित नाही. त्यामुळे तो या मालिकेसाठी उशीराने भारतात दाखल होऊ शकतो, असे न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, न्यूझीलंडला आशा आहे की जरी विलियम्सन पहिल्या सामन्यात खेळला नाही, तरी तो नंतर संघासाठी उपलब्ध असेल.
विलियम्सनला पर्याय म्हणून न्यूझीलंडने मार्क चॅपमनला संधी दिली आहे. चॅपमनचे अद्याप कसोटी पदार्पण झालेलं नाही. त्याची प्रथम श्रेणीमधील कामगिरी आत्तापर्यंत चांगली झाली आहे. त्याने ४४ सामन्यांत ६ शतकांसह जवळपास ४२ च्या सरासरीने २९५४ धावा केल्या आहेत.
चॅपमनने याआधी न्यूझीलंडकडून २३ वनडे आणि ७६ टी२० सामने खेळलेले आहेत. त्याने वनडेत ४८६ धावा केल्यात, तर आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये १५४८ धावा केल्या आहेत. आता जर पहिल्या कसोटीत विलियम्सन खेळला नाही, तर चॅपमनला कसोटीतही पदार्पणाची संधी मिळू शकते.
तसेच न्यूझीलंडने पहिल्या कसोटीसाठी मायकल ब्रेसवेललाही संधी दिली आहे. तो पहिल्या कसोटीनंतर त्याच्या दुसऱ्या अपत्याच्या जन्मासाठी मायदेशी परतणार आहे. त्यामुळे उर्वरित दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी त्याच्या जागेवर ईश सोधीला संघात स्थान देण्यात आले आहे.
न्यूझीलंड संघ शुक्रवारी (११ ऑक्टोबर) बंगळुरूला येण्यासाठी रवाना होईल.
१६ - २० ऑक्टोबर - पहिला कसोटी सामना, बेंगळुरू (वेळ - स. ९.३० वाजता)
२४ - २८ ऑक्टोबर - दुसरा कसोटी सामना, पुणे (वेळ - स. ९.३० वाजता)
१ - ५ नोव्हेंबर - तिसरा कसोटी सामना, मुंबई (वेळ - स. ९.३० वाजता)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.