India vs New Zealand, 1st Test: न्यूझीलंड क्रिकेट संघाने भारत दौऱ्याची सुरुवात विजयाने केली आहे. न्यूझीलंडने भारताविरुद्ध बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात रविवारी (२० ऑक्टोबर) ८ विकेट्सने विजय मिळवला.
न्यूझीलंडने कसोटीमध्ये तब्बल ३६ वर्षांनंतर भारतात विजय मिळवला आहे. यापूर्वी १९८८ साली मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडने अखेरच्या वेळी १३६ धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे हा विजय न्यूझीलंडसाठी विशेष ठरला आहे. न्यूझीलंडने रविवारी विजय निश्चित करत तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
या सामन्यात भारताने दुसऱ्या डावात न्यूझीलंडसमोर विजयासाठी १०७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना चौथ्या दिवस अखेर न्यूझीलंडने ४ चेंडू खेळताना शून्य धावा केल्या होत्या. त्यामुळे पाचव्या दिवशी त्यापुढे न्यूझीलंडने खेळायला सुरुवात केली.