India vs New Zealand 2nd Test in Pune: न्यूझीलंड क्रिकेट संघाने शनिवारी (२६ ऑक्टोबर) पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर इतिहास रचला. न्यूझीलंडने भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटीत तिसऱ्याच दिवशी ११३ धावांनी विजय मिळवला.
यासह न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-० अशी विजयी आघाडीही घेतली आहे. त्यामुळे आता न्यूझीलंडने मालिकाही खिशात घातली आहे. न्यूझीलंडच्या या विजयात मिचेल सँटेनरने १३ विकेट्स घेत मोलाचा वाटा उचलला.
न्यूझीलंडचा हा भारतातील पहिलाच कसोटी मालिका विजय आहे. यापूर्वी त्यांना भारतात कधीही कसोटी मालिका जिंकता आली नव्हती. तसेच त्यांनी भारतात कसोटी सामन्यात विजय मिळवण्याची ही चौथीच वेळ आहे. न्यूझीलंडने सध्या चालू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातही विजय मिळवला होता.
भारतीय संघ गेल्या १२ वर्षात मायदेशात सलग १८ कसोटी मालिकेत पराभूत झालेला नव्हता. मात्र न्यूझीलंडने भारताचा विजयीरथ रोखला आहे. त्यांनी तब्बल १२ वर्षांनी आणि १८ कसोटी मालिकांनंतर भारतीय संघाला त्यांच्याच मायदेशात कसोटी मालिकेत पराभूत केले. भारतीय संघ मायदेशात अखेरचा २०१२ साली इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत पराभूत झाला होता.