On This Day in Cricket 20th October: भारताचा विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागने त्याच्या निडर फलंदाजीने अनेकदा भारताला विजय मिळवून दिले आहे. २० ऑक्टोबर १९७८ साली दिल्लीत जन्मलेल्या सेहवागचा आज ४६ वा वाढदिवस आहे.
पहिल्या बॉलपासूनच आक्रमक खेळण्याच्या हेतून उरणाऱ्या सेहवागने १९९९ ते २०१३ या १४ वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना अनेक विक्रम नावावर केले. त्याचे असेही काही विक्रम आहेत, जे मोडणे अशक्य नसले, तरी नक्कीच कठीण आहे. त्याच्या अशाच विक्रमांवर एक नजर टाकू.
भारताला अनेक दिग्गज फलंदाजांचा वारसा लाभला आहे. मात्र, असे असले तरी कसोटीत त्रिशतक करणे आत्तापर्यंत फक्त दोन फलंदाजांना जमले आहे. भारतासाठी पहिले त्रिशतक विरेंद्र सेहवागने झळकावले होते. त्याने पाकिस्तानविरुद्ध मुलतानमध्ये २००४ साली ३७५ चेंडूत ३०९ धावांची खेळी केली होती.
त्यानंतर त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चेन्नईत खेळताना २००८ साली ३०४ चेंडूत ३१९ धावांची वादळी त्रिशतकी खेळी केली होती. त्यावेळी तो भारताचा एकमेव खेळाडू ठरला होता, ज्याने दोन त्रिशतके केली.
विशेष म्हणजे त्यावेळी तो कसोटीत त्रिशतक करणारा एकमेव भारतीय खेळाडू होता. नंतर २०१६ मध्ये करुण नायरने त्रिशतक केले. मात्र अद्याप भारतासाठी सेहवाग व्यतिरिक्त कोणालाही कसोटीत दोनवेळा त्रिशतक करता आले नाही. त्याचा हा विक्रम मोडणे कठीण आहे.