On This Day in Cricket 25th September : राजाचा रंक होणे, अशी एक म्हण आहे. ही म्हण क्रिकेटमध्येही दक्षिण आफ्रिकचा माजी कर्णधार हन्सी क्रोनिएला लागू होते. क्रोनिए तसा दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गज कर्णधारांच्या यादीत बसणारा, पण एका घटनेने त्याचं आख्खं करियर उद्धस्थ झालं. काय होती त्याची कहाणी थोडक्यात जाणून घेऊ.
२५ सप्टेंबर १९६९ रोजी ब्लोएमफॉन्टेन येथे हन्सी क्रोनिएचा जन्म झाला. वडील क्रिकेट खेळाचे त्यामुळे त्याला आणि भावालाही क्रिकेटची गोडी लागली. पण ज्यावेळी त्याला क्रिकेटची गोडी लागली होती, त्या काळात दक्षिण आफ्रिका संघावर बंदी होती. पण असं असलं तरी त्याने आणि त्याचा भाऊ फ्रान्स यांनी ही आवड जपली.
पुढे वयाच्या १८ व्या वर्षी क्रोनिएने ऑरेंज फ्री स्टेटकडून पदा्पण केले. त्या संघात त्याचा भाऊ फ्रान्सही होता. त्याला पहिल्या डावात फक्त एक धावा करता आली. दुसऱ्या डावात त्याच्या संघ ५१ धावांवर सर्वबाद झालेला, ज्यात क्रोनिएच्या १६ धावा होत्या.
दरम्यान, नंतर क्रोनिए वयाच्या २१ व्या वर्षीच या संघाचा कर्णधारही झाला. त्याने १९९० मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड संघाविरुद्ध ऑरेंज फ्री स्टेटसाठी पहिले शतकही ठोकले.
त्यानंतर क्रोनिएला १९९२ साली दक्षिण आफ्रिकेच्या संघात स्थान मिळालं. त्याने आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं, ते थेट वनडे वर्ल्ड कपमधून ऑस्ट्रेलिया विरुद्ध. पण पहिल्या सामन्यात त्याला फलंदाजी मिळाली नाही, पण ५ षटके गोलंदाजी केली. क्रोनिये चांगला पार्ट टाईम गोलंदाज होता. त्याचवर्षी वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने कसोटी पदार्पण केलं. पण कसोटी पदार्पणात त्याला फार खास काही करता आलं नाही.
क्रोनिएची लक्षात राहिलेली खेळी म्हणजे १९९२ मध्ये पोर्ट एलिझाबेथला भारताविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटीमध्ये केलेली खेळी. त्यावेळी तब्बल ५२९ मिनिटे खेळपट्टीवर उभे राहुन ४१० चेंडूत नाबाद १३५ धावा केल्या होत्या. त्याची ही खेळी त्याच्या संघासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली. हे त्याचे पहिले कसोटी शतक देखील होते. तो सामना दक्षिण आफ्रिकेने सहज जिंकला होता.
त्यानंतर २४ वर्षांचा असतानाच १९९३-९४ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्वही केले. त्यावेळी तो दक्षिण आफ्रिकेच्या युवा कर्णधारांच्या यादीत बसला. त्यानंतर बॉब वूल्मर हे दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक बनले. ते प्रशिक्षक झाल्यानंतर क्रोनिएकडे दक्षिण आफ्रिकेचा पूर्ण वेळ कर्णधार म्हणून जबाबदारी आली. त्याच्या नेतृत्वात १९९४-९५ मध्ये दश्रिण आफ्रिकेने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत २-१ असा विजयही मिळवला.
क्रोनिए आणि वूल्मर यांची जोडी यशस्वी ठरत होती. क्रोनिएच्या नेतृत्वात खेळताना दक्षिण आफ्रिकेला १९९६ च्या वर्ल्ड कपमध्ये उपांत्यपूर्व फेरीच्या पुढे जाता आले नाही. पण १९९९ च्या वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेला प्रबळ दावेदार समजले जाते होते. मात्र उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांना बरोबरी स्विकारावी लागली आणि स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं. पण याच स्पर्धेत एक वादग्रस्त घटना घडलेली. वूल्मर यांना नवी टेक्नोलॉजी वापरण्याची आवड होती.
मात्र या स्पर्धेदरम्यान ते इअरफोनच्या माध्यमातून क्रोनिए आणि इतर संघातील खेळाडूंशी चर्चा करताना आढळले. भारताबरोबरच्या सामन्यादरम्यान त्यांच्या या कृत्याबद्दल भारतीय खेळाडूंनी त्याची तक्रार पंचांकडे केली. त्यानंतर क्रोनिए आणि बाकीच्यांकडून ते इअरफोन काढून घेण्यात आले.
त्यानंतर पुढच्याच वर्षी सेंच्युरियन कसोटीतील पहिले तीन दिवस पावसामुळे वाया गेले होते. त्यावेळी क्रोनिएने इंग्लंडसमोर प्रस्ताव ठेवला की सामन्याचा निकाल लागण्यासाठी दोन्ही संघ मिळून पहिले डाव घोषित करू. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने ८ बाद २४८ धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर इंग्लंडने २ विकेट्स राखुन धावांचे आव्हान पूर्ण केले आणि सामना जिंकला. मात्र नंतर क्रोनिएने मान्य केले की त्याने तो सामना हरण्यासाठी पैसे घेतले होते.
इथूनच त्याची अधोगती सुरू झाली. २००० मध्ये दक्षिण आफ्रिका संघ भारत दौऱ्यावर आला होता. त्यावेळी दिल्ली पोलिसांच्या हाती मॅच फिक्सिंगचे धागेदोरे लागले होते. त्याचा भारतीय बुकी संजीव चावलासोबतचे फोनकॉल तपासण्यात आले होते. मात्र, त्यावेळी त्याने आधी या आरोपांना फेटाळले. पण त्यानंतर दक्षिण आफ्रिका क्रिकेटचे मॅनेजिंग डिरेक्टर अली बचर यांना पहाटे ३ वाजता फोन कॉलवर त्याने कबुली दिली की तो प्रामाणिकपणे वागलेला नाही.
त्यानंतर त्याला लगेचच कर्णधापदावरून काढून टाकण्यात आलं. तसेच सरकारने किंग्स कमिशन नियुक्त केले. त्यावेळी त्याने मॅच फिक्सिंगबद्दल कबुली दिली. पैशांच्या लालचेपोटी त्याने सर्वं केल्याचे मान्य केले. त्याच काळात भारतीय खेळाडू मोहम्मद अझरुद्दीन, अजय जडेजा हे देखील फिक्सिंगमध्ये अडकले होते. रिपोर्ट्सनुसार अझरुद्दिनने त्याची ओळख मॅच फिक्सर्सची १९९६ साली करून दिली होती.
रिपोर्ट्सनुसार क्रोनिएने पैशासाठी सामना हरणार का असंही मार्क बाऊचर, जॅक कॅलिस, लान्स क्लुझनर यांना विचारलेलं. पण त्यांनी यासाठी नकार दिला. त्यांना ही मस्करी वाटली. पण नंतर हर्षल ग्रिब्स आणि हेन्री विलियम्सने त्याची ऑफर मान्य केली. पण नंतर त्याची मॅच फिक्सिंग समोर आली. त्याने किंग्स कमिशनकडे सर्व गोष्टींची कबुली दिली की तो सामनयाच्या निवडीबद्दल आणि अन्य गोष्टींबद्दलची माहितीही बुकींना पाठवायचा.
त्यानंतर क्रोनिएवर आजीवन बंदी घालण्यात आली हर्षल गिब्स आणि विलियम्स यांच्यावर ६ महिन्यांची बंदी आली. भारताच्या मोहम्मद अझरुद्दीनवरीही बंदी आणली होती. घडलेल्या घटनांबद्दल क्रोनिएला नंतर खूप पश्चातापही झाला. त्याने नंतर क्रिकेटपासून दूर जात उच्च पदवीचे शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान, १ जून २००२ रोजी त्याचा विमान अपघात झाला आउटेंकिया पर्वत रांगामध्ये टक्कर होऊन त्याचा अपघात झाला. या अपघातात त्याच्यासह दोन्ही पायलेट्सचाही जीव गेला. अवघ्या ३२ व्या वर्षी क्रोनिएने जगाचा निरोप घेतला होता.
दरम्यान, त्याची कारकिर्द वादग्रस्त राहिली असली तरी तो आजही दक्षिण आफ्रिकेचा एक उत्तर कर्णधार समजला जातो. त्याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेने १३८ वनडे सामन्यांपैकी ९९ सामने जिंकले होते. कसोटीत ५३ सामन्यांपैकी २७ सामने जिंकले होते, तर केवळ ११ सामने पराभूत झाले होते.
क्रोनिएने त्याच्या कारकिर्दीत ६८ कसोटी सामने खेळले, ज्यात त्याने ६ शतके आणि २३ अर्धशतकांसह ३७१४ धावा केल्या. त्याने ४३ विकेट्सही घेतल्या. त्याने वनडेत १८८ सामन्यांमध्ये २ शतके आणि ३९ अर्धशतकांसह ५५६५ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर ११४ विकेट्स घेतल्या.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.